खरातचा सीए माफीचा साक्षीदार बनणार? खरातविरोधातच दिलीय तक्रार, शेकडो कोटी परदेशात पाठवले, कोण आहे ललित पोफळे?
अशोक खरात प्रकरणाला आता नवं वळण लागण्याची शक्यता आहे. महिला अत्याचाराच्या आरोपानंतर आता आर्थिक गैरव्यवहाराचेही गंभीर आरोप होत आहेत. यात काही व्यवहार हे संशयास्पद असून हवालाच्या माध्यमातून खरातने शेकडो कोटी परदेशात पाठवल्याचा आरोप केला जात आहे. खरातच्या शिवनिका ट्रस्टच्या आर्थिक संशयास्पद व्यवहारांवर पोलिस तपास करत असून, 2018 मध्ये केवळ चार लाखांची उलाढाल असलेल्या या ट्रस्टने 2024 पर्यंत कोटींच्या घरात झेप घेतल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
शिवनिका या ट्रस्टच्या माध्यमातून झालेले व्यवहार, संबंधित व्यक्ती आणि निधीचा स्त्रोत याचा सखोल तपास केला जाणार आहे. यामध्ये ट्रस्टचे संचालक म्हणून सीए ललित पोफळे यांची भूमिका महत्त्वाची मानली जात असून, त्यांच्या चौकशीची शक्यता वर्तवली जात असताना एक नवी नाट्यमय घडामोड घडत असताना दिसत आहे. तर सीए ललित पोफळे यांनी स्वतःला वाचवण्यासाठी खरात यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनचा दरवाजा ठोठावल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या घडामोडींमुळे पिडीतांकडून संशय व्यक्त केला जात असून, पोफळे फिर्यादी झाल्यास त्यांना कायदेशीर संरक्षण मिळू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरात यांच्या माध्यमातून झालेल्या आर्थिक व्यवहारांमध्ये सीए ललित पोफळे यांची भूमिका महत्त्वाची असल्याचा आरोप आहे. खरात याचे सुमारे 100 कोटी रुपये दुबईला पाठवण्यात पोफळे याचा सहभाग असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय, आतापर्यंत 300 कोटी रुपयांहून अधिक हवाला व्यवहार पोफळे यांच्या माध्यमातून झाल्याचीही चर्चा आहे. या प्रकरणात पोफळे यांचे भाऊ हर्षद प्रकाश पोफळे देखील पोलिसांच्या रडारवर असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.पोफळे याचे क्लायंट्सही अत्यंत उच्चभ्रू असल्याचे समोर आले आहे. मुंबई आणि दिल्लीसह देशभरातील अनेक मोठे व्यापारी व उद्योजकांचा समावेश असल्याचे सांगितले जाते.
मोठ्या उद्योजकांना त्यांच्या वैयक्तिक किंवा कौटुंबिक अडचणींमधून बाहेर काढण्याच्या बहाण्याने पोफळे त्यांना विविध बुवा-बाबा आणि ज्योतिषांकडे घेऊन जात असत. या प्रक्रियेत क्लायंट्सची सविस्तर वैयक्तिक व आर्थिक माहिती आधीच गोळा करून ती अशोक खरात आणि इतर ज्योतिषांना पुरवली जात होती. त्यामुळे संबंधित ज्योतिषांना त्या व्यक्तींवर प्रभाव टाकणे सोपे होत असल्याचा आरोप आहे.उद्योजकांच्या आर्थिक क्षमतेनुसार त्यांना वेगवेगळ्या व्यक्तीकडे नेले जात असल्याचेही समोर आले आहे. 1000 कोटींपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या उद्योजकांना बेंगळुरूतील लक्ष्मण महाराज, 500 कोटींपेक्षा जास्त असलेल्यांना अशोक खरात, तर 200 कोटींपेक्षा जास्त असलेल्यांना सुजित देशमुख महाराज यांच्याकडे नेण्यात येत होते. तसेच रघुनाथ येमूळ या ज्योतिषाकडेही अनेक क्लायंट्सना नेण्यात आले होते.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विधानसभेत या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, अशोक खरात आणि त्यांच्याशी संबंधित सर्व ट्रस्टची सखोल चौकशी केली जाईल, अशी घोषणा केली आहे.एकीकडे चौकशीची प्रक्रिया वेग घेत असताना, दुसरीकडे पोफळे यांनी दाखल केलेल्या एफआयआरमुळे प्रकरणाला नवे राजकीय आणि कायदेशीर वळण मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात पुढे काय उलगडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.