उद्योगांना पाइपद्वारे गॅसपुरवठा; उद्योगमंत्री उदय सामंत यांची आढावा बैठकीत घोषणा, काळाबाजार करणाऱ्या कडक कारवाई!
पुणे : पुणे जिल्ह्यातील उद्योगांना पाइपद्वारे नैसर्गिक गॅस (पीएनजी) पुरवठा करण्यात येइल. शंभर टक्के जोडणी पूर्ण करण्याच्या दृष्टीने 'मागेल त्या उद्योगाला जोडणी', अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली. यासाठी संबंधित विभागांनी समन्वय साधून विशेष शिबिराचे आयोजन करावे, अशी सूचना सामंत यांनी केली.
युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उद्योग मंत्री सामंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (दूरदृश्य प्रणालीद्वारे), जिल्हा पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल, अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत, अपर पोलीस आयुक्त रंजन शर्मा, पुणे महापालिकेचे अपर आयुक्त ओमप्रकाश दिवटे तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे संतोष भिसे, महेश सुधाळकर आणि उद्योग संघटनांचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते.
सामंत म्हणाले, ''उद्योगांची उत्पादन क्षमता अबाधित राखणे ही राज्याच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. नैसर्गिक गॅस हा उद्योगांसाठी स्वस्त आणि पर्यावरणपूरक ऊर्जा स्रोत आहे. त्यामुळे एमआयडीसी, गॅस वितरण कंपन्या आणि जिल्हा प्रशासन यांनी एकत्रितपणे नियोजन करून प्रत्येक पात्र उद्योगापर्यंत पीएनजी जोडणी पोहोचवावी. घरगुती गॅसची कृत्रिम टंचाई निर्माण करून काळाबाजार करणाऱ्या एजन्सींवर कडक कारवाई करावी.''
या मोहिमेंतर्गत विशेष शिबिरे आयोजित करून अर्ज प्रक्रिया सुलभ करणे, तांत्रिक तपासणी जलदगतीने पूर्ण करणे आणि प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे यावर भर द्यावा. उद्योगांना सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी एमआयडीसीमधील उपलब्ध जागा ३० वर्षांच्या दीर्घकालीन करारावर उपलब्ध करून दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
उदय सामंत म्हणाले...
एमआयडीसी क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी सुमारे ३५० कोटी रुपयांची विकासकामे सुरू आहेत.हिंजवडी औद्योगिक परिसरात कायमस्वरूपी स्वच्छतागृह तसेच पोलिस ठाण्यासाठी जागा देण्यात येणार.वीज बिल भरण्यासाठी मुदतवाढ देण्याच्या लघुउद्योगांच्या मागणीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.