Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नागपूर खंडपीठाचा निर्णय! आरटीई प्रवेशातील अंतराची अट स्थगित; पालकांना पुन्हा अर्ज करण्याची संधी, काय आहे आदेश..

नागपूर खंडपीठाचा निर्णय! आरटीई प्रवेशातील अंतराची अट स्थगित; पालकांना पुन्हा अर्ज करण्याची संधी, काय आहे आदेश..



पुणे : 'आरटीई'अंतर्गत खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांसाठीच्या प्रवेशप्रक्रियेत लागू केलेली घरापासून एक किलोमीटर अंतरातील शाळांपुरती मर्यादा उच्च न्यायालयाने स्थगित केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या अटीवर आक्षेप घेत राज्य सरकारला सुधारित प्रक्रिया राबविण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे आता पालकांना पुन्हा अर्ज करण्याची संधी मिळणार असून, प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ दिली आहे.



न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती राज वाकोडे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान सरकारची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने सरकारच्या धोरणावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. यावर्षी 'आरटीई' प्रवेशासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १० मार्च होती. मात्र, नव्या शासननिर्णयानुसार केवळ एक किलोमीटर परिसरातील शाळांमध्येच अर्ज करता येत असल्याने अनेक पालकांना शाळांचा पर्यायच उपलब्ध होत नव्हता. त्यामुळे अनेक ठिकाणी पालकांनी तीव्र विरोध दर्शवला होता. या अटीमुळे विशेषतः ग्रामीण भागातील पालकांना अर्ज करता येत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली होती.
राज्यात गेल्या शैक्षणिक वर्षात 'आरटीई'साठी सुमारे तीन लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले होते. यंदा एक किलोमीटर अटीमुळे अर्जांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहण्याची शक्यता व्यक्त होत होती. या पार्श्‍वमीवर न्यायालयाने हस्तक्षेप करत पालकांना संधी मिळावी, यासाठी अर्ज प्रक्रियेस मुदतवाढ देण्याचे निर्देश दिले. या निर्णयानंतर पालक संघटनांकडून समाधान व्यक्त करण्यात आले आहे.
'आरटीई'अंतर्गत प्रवेशासाठी एक किलोमीटरची मर्यादा लावणे, हे कायद्याच्या विरोधात होते. न्यायालयाच्या निर्णयामुळे अनेक पालकांना दिलासा मिळाला असून, मुलांना शाळेचा पर्याय उपलब्ध होणार आहे. याबाबत आम आदमी पक्षाच्या मदतीने पालकांनी आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन केले, निवेदने दिली, पत्रकार परिषद घेतली, मेल पाठवले व ही अट बेकायदा असल्याने तातडीने रद्द करावी, अशी मागणी केली होती.
- मुकुंद किर्दत, प्रवक्ते, आम आदमी पक्ष

न्यायालयाच्या आदेशातील मुद्दे

'आरटीई' प्रवेश प्रक्रियेत असलेली एक किलोमीटर अंतराची मर्यादा स्थगित

'आरटीई' कायद्यानुसार प्रवेश प्रक्रिया पूर्वीप्रमाणे नियमांनुसार राबविण्याचे निर्देश

पालकांना अर्ज करण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्याचे राज्य सरकारला आदेश

प्रवेश अर्ज प्रक्रियेसाठी पालकांना अतिरिक्त वेळ देण्याचे निर्देश

अंतरिम आदेशानुसार अर्ज सादर करण्यासाठी तीन दिवसांची मुदतवाढ देण्यास सांगितले

संबंधित प्राधिकरणांनी न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.