पुणे: राज्यात सध्या भोंदू बाबांच्या प्रकरणांनी मोठी खळबळ उडाली असतानाच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिकमधील अशोक खरात प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच आता वसईतील एका स्वयंघोषित धर्मगुरूवर बलात्काराचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
वसईतील भोंदू गुरूविरुद्ध गुन्हा दाखल
वसईतील स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य याच्याविरोधात माणिकपूर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 'मी महादेवाचा अवतार आहे आणि तू माझी पार्वती आहेस' असे सांगून त्याने एका महिलेची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
फेसबुकवरून ओळख, नंतर जाळ्यात अडकवले
मिळालेल्या माहितीनुसार, 35 वर्षीय पीडित महिला पुण्यात राहते. 2023 मध्ये तिची आरोपीशी फेसबुकवर ओळख झाली. तिच्या धार्मिक प्रवृत्तीचा फायदा घेत आरोपीने तिला अध्यात्म शिकवण्याच्या बहाण्याने जवळीक साधली.
पुण्यात लॉजमध्ये नेऊन अत्याचार
डिसेंबर 2023 मध्ये आरोपी पुण्यात आला. त्याने 'तू पार्वती आहेस' असे सांगत महिलेला भुलवले आणि मांजरी येथील एका लॉजमध्ये नेले. तिथे गुंगीकारक पदार्थ देऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. एवढेच नाही तर तिच्या नकळत अश्लील फोटोही काढण्यात आले.
ब्लॅकमेल करून पुन्हा अत्याचाराचा प्रयत्न
या छायाचित्रांच्या आधारे आरोपीने महिलेला ब्लॅकमेल केले. मे 2025 मध्ये वसईतील एका हॉटेलमध्ये बोलावून पुन्हा अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.
धैर्याने पतीला सांगितला प्रकार
दरम्यान, अशोक खरात प्रकरण समोर आल्यानंतर पीडित महिलेने धैर्य दाखवत आपल्या पतीला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर बुधवारी संध्याकाळी माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
तपास पुण्याकडे वर्ग
बलात्काराची पहिली घटना पुण्यात घडल्याने हे प्रकरण मांजरी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे. या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक हिरालाल जाधव यांनी माहिती दिली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
अनेक महिलांना जाळ्यात ओढल्याचा संशय
पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, आरोपीने धर्मगुरू असल्याचे भासवून अनेक महिलांना आपल्या जाळ्यात ओढले आणि त्यांचे लैंगिक शोषण केले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास अधिक गंभीर बनला आहे.राज्यात सलग उघड होत असलेल्या अशा घटनांमुळे भोंदू बाबांविरोधात कडक कारवाईची मागणी जोर धरत आहे. श्रद्धेचा गैरफायदा घेऊन महिलांचे शोषण करणाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.