मूळव्याध शस्त्रक्रियेनंतरही सुट्टी नाकारली! अखेर लोको पायलटने अधिकाऱ्यासमोरच काढली पँट; रेल्वेतील धक्कादायक प्रकार
रेल्वे प्रशासनातील धक्कादायक वागणुकीचा प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील राजधानीत काम करणाऱ्या एका लोको पायलटला मूळव्याध शस्त्रक्रियेनंतरही विश्रांती नाकारण्यात आली. आपली गंभीर प्रकृती सिद्ध करण्यासाठी त्याला अधिकाऱ्यांसमोरच पँट काढावी लागली.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुप्सवर वेगाने पसरला असून, कर्मचारी संघटनांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
लखनऊ रेल्वे विभागात कार्यरत
पीडित लोको पायलट राजेश मीणा हे लखनऊ रेल्वे विभागात कार्यरत आहेत. २२ फेब्रुवारी रोजी त्यांची लखनऊमध्ये मूळव्याध शस्त्रक्रिया झाली. डॉक्टरांनी त्यांना २२ ते २८ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. मात्र, विश्रांतीचा कालावधी संपल्यानंतर जखम पूर्णपणे भरली नव्हती. त्यामुळे ते ड्युटीवर रुजू होऊ शकले नाहीत. नियमांनुसार त्यांनी रेल्वे आरोग्य युनिटकडे विश्रांती वाढविण्याची विनंती केली.
प्रकृती गंभीर
आरोग्य युनिटमधील डॉक्टरांनी त्यांची तपासणी केल्यानंतर प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले. त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून 'आजारी मेमो' आणण्याचे निर्देश दिले. राजेश मीणा यांनी क्रू कंट्रोलर आणि तत्कालीन चीफ क्रू कंट्रोलर रतन कुमार यांच्याकडे वारंवार विनंती केली. त्यांनी वैद्यकीय कागदपत्रे, प्रयोगशाळेचे अहवाल आणि जखमेवरील ड्रेसिंगही दाखवले. तरीही अधिकाऱ्यांनी सुट्टी देण्यास स्पष्ट नकार दिला. सूत्रांच्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांवर त्वरित ड्युटीवर परत पाठविण्याचा दबाव होता.
आपली बाजू मांडण्यासाठी पँट काढली
वारंवार होणाऱ्या नकारामुळे आणि आजाराबद्दल व्यक्त होणाऱ्या शंकांमुळे मीणा पूर्णपणे निराश झाले. शेवटी त्यांनी कार्यालयातच शस्त्रक्रियेच्या ताज्या जखमा दाखवून आपली बाजू मांडण्यासाठी पँट काढली. उपस्थित कर्मचारी या दृश्याने स्तब्ध झाले. ऑल इंडिया लोको रनिंग स्टाफ असोसिएशन (एआयएलआरएसए) च्या नेत्यांनी तातडीने हस्तक्षेप केल्यानंतरच त्यांची सुट्टी मंजूर झाली.
एआयएलआरएसएने या प्रकाराला कर्मचाऱ्यांच्या स्वाभिमानाचा आणि मानवी हक्कांचा घोर अपमान म्हटले आहे. संघटनेने दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.