Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

खासगी शिकवणी वर्गाबाबत मोठा निर्णय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'आता'..

खासगी शिकवणी वर्गाबाबत मोठा निर्णय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'आता'..

पिंपरी : खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथील खासगी दहावीच्या शिकवणी वर्गात एका विद्यार्थ्याची हत्या झाल्याच्या घटनेनंतर आता राज्य शासनाने राज्यातील खासगी शिकवणी वर्गांची नोंदणी व विनियमन करण्यासाठी खासगी शिकवणी नोंदणी व विनियमन अधिनियम (कायदा) तयार करण्याची कार्यवाही सुरु केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत लेखी उत्तरात दिली.

शिकवणी वर्ग, शाळा, महाविद्यालय येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत सूचना दिल्याचेही मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे.

राजगुरुनगर येथे दहावीच्या खासगी शिकवणी वर्गात १५ डिसेंबर २०२५ रोजी एका विद्यार्थ्याची दुसऱ्या विद्यार्थ्याकडून हत्या करण्यात आली होती. याबाबत शिवसेना (ठाकरे) पक्षाचे आमदार सुनील शिंदे यांनी प्रश्न विचारला होता. किरकोळ वाद मनात ठेऊन एखाद्याचे जीवन संपविण्याचा विचार कोवळ्या वयात केला जात असून शिकवणी वर्गात घडलेली ही हिंसक घटना मुलांच्या बदललेल्या भयावह मानसिकतेचे दर्शन घडवित आहे.

शासनाने या घटनेची नोंद घेऊन राज्यातील सर्व खासगी शिकवणी वर्गांची सक्तीची नोंदणी, सुरक्षा मानके, सीसीटीव्ही व्यवस्था, शिक्षकांची पार्श्वभूमी तपासणी व जबाबदारी निश्चित करण्यासाठी स्वतंत्र नियमावली, कायदा करण्याचा निर्णय घेतला आहे का, भविष्यात अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत, असे विविध प्रश्न शिंदे यांनी विचारले होते. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तर दिले आहे.

राजगुरुनगर येथील शिकवणी वर्गात विद्यार्थ्याची हत्या झाल्याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अल्पवयीन मुलगा निरीक्षण गृहामध्ये आहे. राज्यातील शाळा, खासगी शिकवणी वर्गांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांवर अतिरिक्त ताण तणाव निर्माण होऊ नये याकरिता ७ जानेवारी २०२६ रोजी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.

राज्यातील खासगी शिकवणी वर्गांची नोंदणी व विनियमन करण्यासाठी खासगी शिकवणी नोंदणी व विनियमन अधिनियम (कायदा) तयार करण्याची कार्यवाही शासन स्तरावर सुरु आहे. अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी पोलीस अधिकारी, अंमलदार यांनी शाळा व महाविद्यालयांना भेटी देऊन मुलांचे समुपदेशन करण्यात येते. निर्भया पथकामार्फत शाळा, महाविद्यालय तसेच शिकवणी वर्गात जाऊन विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात येते. एनएसएस व एनसीसी विद्यार्थ्यांच्या कॅम्पला भेटी देऊन, महिला व दक्षता कमिटीच्या मार्फत विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात येते. शाळा, महाविद्यालयामध्ये पालकसभेवेळी पालकांचेही समुपदेशन करण्यात येते. शिकवणी वर्ग, शाळा, महाविद्यालय येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत सूचना दिल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.