मुलींसाठी भन्नाट योजना! जन्मानंतर लगेचच ५००० रुपये अन् १८ वर्षे झाल्यावर मिळणार एक लाख एक हजार रुपये, पिवळे, केशरी रेशनकार्डधारक लाभार्थी, वाचा...
सोलापूर : मुलीच्या शिक्षणाचा खर्च आई-वडिलांना पेलवत नाही, त्यामुळे अनेक मुलींना अर्ध्यातूनच शाळा सोडावी लागत होती. या पार्श्वभूमीवर अशा मुलींच्या शिक्षणाचा व तिच्या पुढील भविष्याचा विचार करून राज्य शासनाने १ एप्रिल २०२३ पासून 'लेक लाडकी' योजना सुरु केली. त्याअंतर्गत आतापर्यंत सोलापूर शहर-जिल्ह्यातील १२ हजार ४८३ मुलींना लाभ मिळाला असून त्यांच्या खात्यात पहिल्या टप्प्यातील प्रत्येकी पाच हजार रुपये जमा झाले आहेत.
'लेक लाडकी योजनेत पिवळ्या, केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील मुलींना जन्मापासून १८ वर्षांपर्यंत एकूण १ लाख १ हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाणार आहे. मुलींच्या सक्षमीकरणासाठी आणि शिक्षणासाठी योजनेतून ५ हप्त्यांत थेट बँक खात्यात रक्कम जमा होणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचा जन्म महाराष्ट्रात होणे आवश्यक असून मुलीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी असावे, अशा अटी आहेत.एका कुटुंबातील दोन मुलींनाच योजनेचा लाभ घेता येतो. योजनेच्या लाभासाठी अर्ज करताना अर्जासोबत मुलीचे व पालकांचे आधारकार्ड, रेशनकार्ड, मुलीचा जन्म दाखला, रहिवासी दाखला, बॅंक पासबूक झेरॉक्स, दुसऱ्या अपत्यानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागते. दक्षिण सोलापूर तालुक्यात सर्वाधिक आठशे कुटुंबांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. १८ वर्षांनंतर पुढील उच्च शिक्षण राज्य शासनाने मोफतच केले आहे. त्यामुळे आई-वडिलांना बोज वाटणारी 'ती' आता लाडकी झाली आहे.
निधीचे असे आहेत टप्पे...
जन्मानंतर : ५ हजार रुपये (जन्म दाखला व नाव नोंदणीनंतर)
पहिली इयत्ता : ६,००० रुपये
सहावी इयत्ता : ७,००० रुपये
अकरावी इयत्ता : ८,००० रुपये
१८ वर्ष पूर्ण झाल्यावर : ७५,००० रुपये (शिक्षण सुरू असल्याचा दाखला दिल्यावर)
पात्र लाभार्थींचे पालक अर्ज करु शकतात
लेक लाडकी योजना ही मुलींच्या शिक्षणाची चिंता दूर करणारी आहे. १ एप्रिल २०२३ नंतर महाराष्ट्रात जन्मलेल्या मुली योजनेसाठी पात्र आहेत. योजनेच्या निकषांनुसार पात्र असलेले पालक त्यांच्या मुलींच्या लाभासाठी जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाकडे अर्ज करू शकतात. आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यातील बारा हजारांवर मुली या योजनेच्या लाभार्थी झाल्या आहेत.- प्रसाद मिरकले, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, सोलापूर
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
