धुळे : घरगुती गॅस दरवाढ आणि देशात निर्माण झालेल्या गॅस टंचाईच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या वतीने धुळ्यात अनोखे आंदोलन करण्यात आले. जिल्हा रुग्णालय परिसरातील गटारीजवळ प्रतीकात्मक पद्धतीने नळी टाकून चहा बनवत केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांचा निषेध व्यक्त करण्यात आला. या आंदोलनात कार्यकर्त्यांनी "नरेंद्र गायब सिलेंडर" अशी घोषणा देत गॅस दरवाढ व टंचाईबाबत केंद्र सरकारवर तीव्र टीका केली. देशात घरगुती गॅसची टंचाई निर्माण झाली असून सर्वसामान्य नागरिकांना सिलेंडरसाठी रांगा लावाव्या लागत आहेत. त्यामुळे नागरिकांचा वेळ व श्रम वाया जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणातील अपयशामुळे देशात इंधन आणि गॅस पुरवठ्याबाबत अस्थिरता निर्माण झाली आहे. सरकारने परिस्थिती नियंत्रणात आणण्याऐवजी गॅसच्या किमती वाढवून सर्वसामान्य जनतेचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. घरगुती सिलेंडरच्या किमतीत वाढ झाल्यामुळे मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याचा आरोपही करण्यात आला.
आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पूर्वीच्या "गटारीतून गॅस टेक्नॉलॉजी काढली जाऊ शकते" या वक्तव्याचा उल्लेख करत त्यावर टीका केली. त्याच्या निषेधार्थ गटारीत नळी टाकून प्रतीकात्मकरीत्या चहा बनवत आंदोलन करण्यात आले. शैक्षणिक चौक परिसरातही कार्यकर्त्यांनी अशाच प्रकारे निदर्शने करत गॅस दरवाढीचा निषेध नोंदविला.
या आंदोलनात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, महानगर प्रमुख धिरज पाटील, उपजिल्हा प्रमुख नरेंद्र परदेशी, विधानसभा संघटक संदीप सूर्यवंशी, शहर संघटक प्रशांत भामरे, शहर समन्वयक सुभाष मराठे, सुनिल पाटील, राजेंद्र ढवळे, तसेच निबा मराठे, गजाक्षी वानखेडे, अरुणा मोरे, सुनिता वाध, गजेंद्र पाटील, भरत मोरे, आनंद जावडेकर, शेखर वाघ, शिवाजी शिरसाळे, मनोज बंव, सुनिल चौघटे, अण्णा फुलपगारे, जवाहर पाटील, गुलाब बानी, शुभम रणधीर, निलेश कांजरेकर, सचिन शिंदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, गॅस दरवाढ आणि टंचाईबाबत केंद्र सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा पुढील काळात अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.
दरम्यान, आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत सर्वसामान्य नागरिकांवर वाढत्या महागाईचा होणारा परिणाम अधोरेखित केला. गॅस दरवाढ, टंचाई आणि वाढती महागाई यामुळे कुटुंबांचा घरखर्च सांभाळणे कठीण होत असल्याचे सांगत सरकारने तातडीने गॅसचा पुरवठा सुरळीत करावा व दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच गॅस टंचाईचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी न लावल्यास राज्यभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
