पुण्यातील एका प्रतिष्ठित संस्थेने सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा आणि गॅस सिलिंडरला एक मोठा पर्याय शोधून काढला आहे. सध्या इराण आणि इस्रायलमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे जगभरात इंधनाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे, ज्याचा थेट फटका भारताला बसत असून एलपीजी गॅसची मोठी टंचाई निर्माण झाली आहे.
या संकटकाळात पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीने (एनसीएल) विकसित केलेले 'डायमेथिल ईथर' (डीएमई) हे स्वदेशी इंधन गेम चेंजर ठरू शकते. विशेष म्हणजे, हे इंधन वापरण्यासाठी तुम्हाला घरातील गॅस शेगडी किंवा सिलिंडर बदलण्याची अजिबात गरज भासणार नाही.
पुण्यातील संशोधनाचा देशाला मोठा आधार
इराण युद्धासारख्या जागतिक संकटामुळे एलपीजी गॅसचे दर सातत्याने वाढत आहेत आणि पुरवठाही कमी होत आहे. अशा वेळी बाहेरून इंधन मागवण्यापेक्षा आपल्याच देशात इंधन तयार व्हावे, या उद्देशाने सीएसआयआर-नॅशनल केमिकल लॅबोरेटरी म्हणजेच एनसीएलने कंबर कसली आहे.एनसीएलने या इंधनाचा पायलट प्लांट यशस्वीरित्या सुरू केला असून आता त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढवण्याची तयारी सुरू केली आहे. डीएमई हे एक कृत्रिम इंधन असून ते मिथेनॉलपासून तयार केले जाते. हे मिथेनॉल सुका कचरा, कोळसा किंवा हवेतील कार्बन डायऑक्साइडपासून मिळवता येते.
घरच्या गॅस यंत्रणेत कोणताही बदल नको
अनेकदा नवीन इंधन वापरायचे म्हटले की नवीन शेगडी किंवा वेगळ्या प्रकारचे सिलिंडर घ्यावे लागतात, असा समज असतो. मात्र, एनसीएलचे संचालक आशिष लेले यांनी स्पष्ट केले आहे की, एलपीजी ऐवजी डीएमई वापरताना सध्याच्या कोणत्याही पायाभूत सुविधांमध्ये बदल करावा लागणार नाही.
तुमचे सध्याचे सिलिंडर, गॅस रेग्युलेटर, रबरी नळी आणि अगदी गॅसचे बर्नर देखील आहे तसेच वापरता येतील. हे इंधन एलपीजीमध्ये मिसळून किंवा स्वतंत्रपणे सुद्धा वापरता येऊ शकते, ज्यामुळे गॅसची टंचाई दूर होण्यास मदत होईल.
सुरक्षितता आणि भविष्यातील स्वस्त पर्याय
भारतीय मानक ब्युरोने (बीआयएस) घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वापरासाठी एलपीजीमध्ये डीएमई मिसळण्याबाबतचे नियम आणि मानके आधीच निश्चित केली आहेत. डीएमईचे गुणधर्म एलपीजीशी मिळतेजुळते असल्यामुळे ते पूर्णपणे सुरक्षित मानले जाते. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या की घरगुती गॅसचे दरही वाढतात, अशा परिस्थितीत पुण्यात विकसित झालेले हे तंत्रज्ञान सर्वसामान्यांना मोठा दिलासा देऊ शकते. आगामी काळात या प्रकल्पाची व्याप्ती वाढवण्यावर शास्त्रज्ञांचा भर आहे, जेणेकरून युद्धामुळे होणारी टंचाई नागरिकांना जाणवणार नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
