Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

रेमंडचे मालक गौतम सिंघानियांचा मालदीवमध्ये भीषण अपघात! समुद्रात स्पीडबोट उलटली; एअरलिफ्ट करून तातडीने मुंबईत दाखल

रेमंडचे मालक गौतम सिंघानियांचा मालदीवमध्ये भीषण अपघात! समुद्रात स्पीडबोट उलटली; एअरलिफ्ट करून तातडीने मुंबईत दाखल


मालदीव: रेमंड ग्रुपचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया यांना मालदीवमध्ये झालेल्या बोट अपघातात दुखापत झाली असून त्यांच्यावर सध्या मुंबईत उपचार सुरू आहेत. गुरुवारी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास फेलिधू परिसरात त्यांची स्पीडबोट समुद्रात पलटल्याची घटना घडली. अपघातानंतर तातडीने बचावकार्य हाती घेण्यात आले आणि सिंघानिया यांना एअरलिफ्ट करून मुंबईत आणण्यात आले.

या बोटीत सिंघानिया यांच्यासह एकूण 7 जण होते. अपघातानंतर काही जणांना वाचवण्यात यश आले असले तरी एक भारतीय नागरिकासह 2 जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. समुद्रात शोधमोहीम सुरू असून स्थानिक यंत्रणा त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे पर्यटनस्थळांवरील सुरक्षा आणि खासगी जलवाहतुकीच्या नियमांबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.

गौतम सिंघानिया हे भारतातील नामांकित उद्योगपतींपैकी एक असून रेमंड ग्रुपचे नेतृत्व करत आहेत. सुमारे 11000 कोटी रुपयांच्या संपत्तीचे ते मालक मानले जातात. कपड्यांच्या क्षेत्रात रेमंड हे एक प्रतिष्ठित नाव असून सूटिंग-शर्टिंगपासून डेनिम, कन्झ्युमर केअर, इंजिनिअरिंग आणि रिअल इस्टेटपर्यंत कंपनीचा विस्तार आहे. भारतीय तयार कपड्यांच्या बाजारात रेमंडने दीर्घकाळ आपली मजबूत पकड राखली आहे.

या अपघाताने उद्योगक्षेत्रासह व्यावसायिक जगतातही खळबळ उडवली आहे. परदेशात सुटीसाठी गेलेल्या उद्योगपतीला अशा प्रकारे अपघाताला सामोरे जावे लागणे ही बाब अनेकांसाठी धक्कादायक आहे. विशेषतः समुद्रातील अॅक्टिव्हिटीज करताना सुरक्षा उपायांचे पालन किती महत्त्वाचे आहे, हे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे. दरम्यान, सिंघानिया यांच्या प्रकृतीवर डॉक्टर लक्ष ठेवून असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. मात्र बेपत्ता असलेल्या व्यक्तींचा शोध लागेपर्यंत या अपघाताची चिंता कायम राहणार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.