Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

रात्री दीड वाजता घडला भयंकर प्रकार, फिरायला गेलेली तरुणी रात्रभर जखमी अवस्थेत जंगलात लपली, नेमकं काय घडलं?

रात्री दीड वाजता घडला भयंकर प्रकार, फिरायला गेलेली तरुणी रात्रभर जखमी अवस्थेत जंगलात लपली, नेमकं काय घडलं?


नैनिताल: देवभूमी उत्तराखंडमधील नैनितालमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या एका तरुणीसोबत भयंकर प्रकार घडला आहे. ती एकटीच पर्यटनासाठी नैनितालला गेली होती. मात्र हा निर्णय तिला आयुष्यभरासाठी जखम देणारा ठरला आहे. तिला एका जंगलात रात्रभर जखमी अवस्थेत राहावं लागलं आहे. एका टॅक्सीचालकाने दगा दिल्याने तिला अशाप्रकारे जंगलात लपून बसावं लागलं. सकाळी उजेड होताच तिने स्वत:ची सुटका करून घेतली. मात्र या घटनेनं सर्वत्र खळबळ उडाली आहे.


नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही दिल्लीची रहिवासी आहे. ती नैनितालला सोलो ट्रीपवर गेली होती. डेहराडूनमार्गे ती काठगोदाम येथे पोहोचली. तिथून नैनितालला जाण्यासाठी तिने एक टॅक्सी भाड्याने घेतली. मात्र, प्रवासादरम्यान मध्यरात्री १:३० च्या सुमारास चालक दीपक सिंह बोरा याने टॅक्सी मुख्य रस्त्यावरून हटवून पटवा डांगर येथील एका निर्जन आणि अंधाऱ्या रस्त्याकडे वळवली.

प्रतिकार केल्यावर मारहाण आणि अपहरण

रस्ता बदलल्याचे लक्षात येताच तरुणीने चालकाला जाब विचारला. यावर चालकाने तिला अश्लील शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याने तरुणीचा मोबाईल हिसकावून घेतला आणि तिचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.

जखमी अवस्थेत रात्रभर जंगलात लपली

नराधम चालकाच्या तावडीतून सुटण्यासाठी तरुणीने धाडस दाखवत चालत्या टॅक्सीतून उडी घेतली आणि जवळच असलेल्या घनदाट जंगलात धाव घेतली. रात्रभर ती जखमी अवस्थेत आणि आरोपीच्या दहशतीखाली जंगलात लपून बसली होती. मोबाईल नसल्यामुळे तिला कोणाशीही संपर्कही साधता आला नाही. अखेर शुक्रवारी सकाळी तिने कसेबसे पटवा डांगर गाव गाठले आणि स्थानिकांच्या मदतीने पोलिसांशी संपर्क साधला.

पोलिसांची तत्परता: आरोपीला बेड्या

घटनेचे गांभीर्य ओळखून नैनिताल पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. सीसीटीव्ही फुटेज, टॅक्सीचा क्रमांक आणि जीपीएस ट्रॅकिंगच्या आधारे पोलिसांनी ३९ वर्षीय आरोपी दीपक सिंह बोरा (रा. हलद्वानी) याला अटक केली आहे. आरोपीची चौकशी केली असता तो दुसऱ्याची टॅक्सी चालवत असल्याचं समोर आलं. पोलिसांनी पीडितेचा मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली टॅक्सी जप्त केली आहे. आरोपीविरुद्ध अपहरण आणि बलात्काराच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या नैनितालमध्ये घडलेल्या या घटनेमुळे महिला पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.