लग्न ठरताच २ लाख, लग्नानंतर ५ लाखांची मागणी; भांडणानंतर नांदवण्यासाठी २० लाख मागितले, २२ वर्षीय वैष्णवीनं स्वत:ला संपवलं
पुण्यात आणखी एका वैष्णवीचा बळी गेल्याची घटना समोर आलीय. लग्नाच्या ८ महिन्यातच २२ वर्षीय विवाहितेने पतीसह सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय.
सुरुवातीला फर्निचरसाठी २ लाख, नंतर पत्नीला नांदवायचं असेल तर ५ लाखांची मागणी केली. ते ५ लाख रुपये दिल्यानंतरही २० लाखांची मागणी करण्यात आल्याचा आरोप आत्महत्या केलेल्या विवाहितेच्या कुटुंबियांनी केला आहे. वैष्णवी लाटे असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, वैष्णवीचं यशवंत लाटे याच्याशी ११ मार्च २०२५ रोजी लग्न ठरलं होतं. लग्न ठरल्यानंतर त्यांनी नवीन घराचं बांधकाम केलं होतं. त्या घरात फर्निचरसाठी २ लाखांची मागणी यशवंत लाटे यानं केली होती. ते पैसेही यशवंतला देण्यात आले होते. तर ७ मे रोजी लग्नात मानपान आणि इतर संसार उपयोगी वस्तू दिल्या होत्या. लग्नानंतर काही महिन्यातच यशवंतने वैष्णवीचा छळ सुरू केला.
पती यशवंतचे मुलीसोबत चॅटिंग सापडल्यानंतर वैष्णवीने जाबही विचारला होता. तेव्हा तिला मारहाण करत माहेरी पाठवून दिलं होतं. आता पुन्हा नांदवायचं असेल तर पाच लाख रुपये आणि चारचाकी गाडी घेऊन ये असं म्हणत तिचा छळ केल्याचा आरोप माहेरच्या कुटुंबियांनी केला. शेवटी माहेरच्या लोकांनी १७ जानेवारी २०२६ रोजी पाच लाख रुपये रोख रक्कम दिली असंही वैष्णवीच्या कुटुंबियांनी म्हटलंय.
दरम्यान, घरात इंटेरियर करण्यासाठी २० लाखांची मागणी केली जात आहे. पैसे आणले नाही तर तोंड दाखवू नकोस अशी धमकी पतीने दिल्याचा फोन वैष्णवीने गेल्या आठवड्यात आईला केला होता. यानंतर वैष्णवीचे कुटुंबिय पतीच्या घरी गेले होते. पैसे आणले नाही तर मुलाचे दुसरे लग्न लावून देऊ असं वैष्णवीच्या सासरच्यांनी तिच्या आईला सांगितलं.
वैष्णवीचे आई भेटून गेल्यानंतर दुसर्याच दिवशी वैष्णवीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिने राहत्या घरात ओढणीने गळफास घेतला. या प्रकरणी तिच्या आईने पोलिसात तक्रार दिली असून पतीसह सासू सासऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.