Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पंतप्रधान नरेंद्र मोदींची मिमिक्री करत सिलिंडर तुटवड्याचा व्हिडीओ पोस्ट केल्याने शिक्षकाचं निलंबन

पंतप्रधान नरेंद्र मोदींची मिमिक्री करत सिलिंडर तुटवड्याचा व्हिडीओ पोस्ट केल्याने शिक्षकाचं निलंबन

पंतप्रधान नरेंद्र मोदींची मिमिक्री करत तो व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करणं एका शिक्षकाला महागात पडलं आहे. कारण हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सदर शिक्षकाला निलंबित करण्यात आलं आहे. भाजपाचे पिछोर विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रीतम लोधी यांच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या शिक्षकावर कारवाई केली आहे.


ही घटना मध्य प्रदेशातील आहे. साकेत पुरोहित असं या शिक्षकाचं नाव आहे.

नेमकी घटना काय?

मध्य प्रदेशातील शिवपुरीमध्ये असलेल्या एका गावात साकेत पुरोहित हे शिक्षक आहेत. पोहरी विकासखंडच्या शासकीय प्राथमिक विद्यालयात ते शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी काही दिवसांपूर्वीच एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. ज्यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची मिमिक्री करत गॅस सिलिंडरच्या टंचाईवर आणि वाढत्या किंमतींवर भाष्य केलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्याची चर्चा होऊ लागली. ज्याचा फटका साकेत पुरोहित यांना बसला आहे. साकेत पुरोहित यांना जिल्हाधिकाऱ्यांनी निलंबित केलं आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल करणं त्यांना भोवलं आहे.

पिछोरचे आमदार प्रीतम लोधी यांनी केली तक्रार

सदर व्हिडीओ व्हायरल झाल्यावर भाजपाचे आमदार प्रीतम लोधी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे या संदर्भात तक्रार केली. सरकारी शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकाने अशा पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींची मिमिक्री करणं योग्य नाही. तसंच त्या शिक्षकाने मिमिक्री करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोपही लोधी यांनी केला. ज्यानंतर सरकारी नोकरीत असताना नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी साकेत पुरोहित यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.

पुरोहित यांचं म्हणणं नेमकं काय?

शुक्रवारी रात्री उशिरा सरकारी प्राथमिक शाळेत काम करणाऱ्या साकेत पुरोहित यांना एक फोन आला आणि त्यांचं आयुष्यच बदललं. तुम्हाला निलंबित करण्यात आलं आहे असं त्यावर सांगण्यात आलं होतं. दरम्यान पुरोहित यांनी स्पष्टीकरण देत मी तो व्हिडीओ फक्त मुलांना हसवण्यासाठी केला होता. त्यामागे बाकी इतर कुठलाही हेतू नव्हता असं सांगितलं. मात्र त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. साकेत पुरोहित यांचे वडील कथावाचक आहेत. तसंच साकेत पुरोहित यांचे भाऊ आणि वहिनी हेदेखील शाळा शिक्षकच आहेत. त्यांनीही या व्हिडीओबाबत आणि नंतर झालेल्या कारवाईबाबत मौन बाळगलं आहे. दरम्यान पुरोहित यांनी असं म्हटलं आहे की लोकांना त्यांचा आवाज उठवण्याचा हक्क आहे. मी पाहतो आहे एखादी गोष्ट नर्मविनोदाने केली असेल तरीही त्यावर मर्यादा घातल्या जात आहेत. लोकांना लगेच राग येतो, त्यांच्या भावना दुखावतात ही बाब योग्य नाही.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.