गडचिरोलीत झाला चार 'हार्लेक्विन बेबीं'चा जन्म; 'तीन लाखांत एक' आढळणारा दुर्मीळ आजार
गडचिरोली निसर्गाचा चमत्कार म्हणावा की विज्ञानापुढील आव्हान, गडचिरोली येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयात २८ मार्च रोजी एका अत्यंत दुर्मीळ अशा 'हार्लेक्विन इचथिओसिस' आजाराने ग्रस्त बालकाचा जन्म झाला आहे.
विशेष म्हणजे, गेल्या आठ वर्षांत या रुग्णालयात अशा प्रकारचे बाळ जन्माला येण्याची ही चौथी घटना असून, यामुळे वैद्यकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
तज्ज्ञांच्या देखरेखीखाली उपचार
आरमोरी तालुक्यातील एका महिलेने या बाळाला जन्म दिला. जन्मानंतर बाळाची त्वचा जाड, कठीण आणि भेगाळलेली, डोळे व ओठ बाहेरच्या बाजूला उलटलेले आहेत. वैद्यकीय शास्त्रानुसार, साधारणतः तीन लाख प्रसुतींमागे असे एखादेच प्रकरण आढळते. बाळाला जिल्हा रुग्णालयाच्या विशेष अतिदक्षता विभागात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
तीन घटनांत संसर्गामुळे बाळांचा जन्मताच मृत्यू
अशाच प्रकारच्या तीन बाळांचा जन्म झाला होता. मात्र, या आजाराचे गांभीर्य आणि शरीराची त्वचा नसल्यामुळे होणारा संसर्ग यामुळे तिन्ही बाळांचा जन्मानंतर काही तासांतच मृत्यू झाला.
काय आहे दुर्मीळ आजार?
अंगावर त्वचा नसते, तर त्याऐवजी जाड आणि कठीण पांढऱ्या प्लेट्ससारखे आवरण असते. शरीरावर खोल भेगा असल्यामुळे हालचाल करणे, श्वास घेणे कठीण होते. हा आजार 'एबीसीए-१२' जनुकातील बिघाडामुळे होतो.
'हार्लेक्विन बेबीं'च्या शरीराचे तापमान नियंत्रित राहात नाही, तसेच त्यांना संसर्गाचा सर्वाधिक थोका असतो. त्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होते. यामुळे त्यांना चोवीस तास कृत्रिम आर्द्रता असलेल्या वातावरणात आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवणे आवश्यक असते. डॉ. वर्षा लहाडे, जिल्हा शल्य चिकित्सक
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.