कोल्हापूर :-मिस यू मम्मी, डॅडी..., शिवाजी विद्यापीठात हॉस्टेलमध्ये २३ वर्षीय विद्यार्थीनीनं संपवलं आयुष्य
कोल्हापूर, ता. २१ : शिवाजी विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात इशिता मधुसुदन सावंत (वय २३, रा. रामभुवन वाडा, रायबंदर, गोवा) हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. मृत्यूपूर्वी तिने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली असून 'मिस यू डॅडी, मम्मी, मला माफ करा' असे तिचे शेवटचे शब्द लिहिले आहेत. आत्महत्येचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही.
वसतिगृहातील ३० क्रमांकाच्या खोलीत इशिता चार सहकारी मुलींसोबत राहत होती. गुढीपाडव्याच्या सुटीनिमित्त इतर तिघी मुली गावी गेल्याने इशिता एकटीच खोलीत होती. रात्री उशिरापर्यंत ती खोली बाहेर आली नसल्याने शेजारील खोलीतील मुलींनी आत डोकावून पाहिले असता तिने गळफास घेतल्याचे दिसून आले.
वसतिगृह वॉर्डन
शीला सोनवणे यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने तिला तातडीने सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शेंडा पार्क येथे उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह तिच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. ती एम.ए. मानसशास्त्राच्या द्वितीय वर्षात शिकत होती.
मोबाईल, लॅपटॉप ताब्यात...
इशिताच्या मृतदेहाजवळ मिळालेल्या चिठ्ठीत मम्मी, डॅडी मला माफ करा, असे लिहिले आहे. स्वतःची जन्मतारीखही लिहून ठेवली होती. तिने आत्महत्येपूर्वी कोणाला फोन केले होते का? याचीही माहिती घेतली जात आहे. तिच्या खोलीतून तिचा मोबाईल, लॅपटॉप तपासकामी ताब्यात घेण्यात आला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.