भोंदू खरातच्या मोबाईलमध्ये सापडले 30 ते 40 हाय प्रोफाईल नेत्यांचे नंबर; 'त्या' महिलांना पोलिसांनी तपासासाठी बोलावल्यास नव्या वादाची शक्यता
भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरातचा तपास करताना पोलिसांनाही अडचणी येत आहेत. विशेष तपास पथकाने (एसआयटी) त्याच्या मोबाईलची कसून तपासणी सुरू केली आहे. त्यामुळे या तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.
भोंदू बाबा खरात याच्याशी संबंध असल्याने अनेक राजकीय नेत्यांची कोंडी होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नेत्या रूपाली चाकणकर यांना त्याचा फटका बसला. आता अन्य कोणते नेते यात अडकणार याकडे लक्ष लागलं आहे.
पोलिसांनी भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरातचा मोबाईल ताब्यात घेतला आहे. त्याचा सीडीआर दोन दिवसांपूर्वीच मिळाला. यामध्ये महायुती सरकारमधील एका मंत्र्याचा कॅप्टन खरातशी नियमित संपर्क असल्याचे स्पष्ट झाले. महायुती सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निकटवर्तीय असलेला हा मंत्री कोण? हे सर्वश्रुत आहे.
या मंत्र्यांनी कॅप्टन खरात याच्या घराच्या रस्त्यासाठी तीन कोटी रुपये निधी मंजूर केला होता. मंदिरासाठी रस्ता असल्याचे दाखविण्यात आले आहे. कॅप्टन खरात याच्या मोबाईलमध्ये तीस ते चाळीस हाय प्रोफाईल नेत्यांचे नंबर आढळले. या नंबर बाबत पोलीस आपली माहिती गोपनीय ठेवत आहेत. मात्र या नेत्यांकडे चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. भोंदू कॅप्टन खरात यांनी पोलिसांच्या तपासात फारशी माहिती दिलेली नाही.
अवांतर माहिती सांगत तपासाचा खोळंबा करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत कालपासून अतिशय कणखर भूमिका घेतली आहे. सध्या पोलिसांनी आपल्या तपास 58 चित्रफितींवर केंद्रित केला आहे. या संदर्भात संबंधित महिला अत्यंत धास्तावलेल्या आहेत. त्यांची माहिती अथवा तपासाला बोलविल्यास कुटुंबात नवे वादंग निर्माण होऊ शकते. या भीतीने पोलिसांनाही सावध पावले टाकावी लागत आहेत.
यामध्ये सीडीआर व त्यातील राजकीय नेते यांना तपासासाठी पाचारण करण्याची पोलिसांची तयारी आहे. भोंदू कॅप्टन खरात याच्या तपासाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी पोलिसांनी या राजकीय नेत्यांकडून माहितीची खातरजमा करण्याची तयारी केली आहे. त्यात महायुतीचा एक मंत्री नियमित संपर्कात असल्याचे आढळल्याने, अनेक राजकीय नेत्यांनी कॅप्टन खरात प्रकरणाचा धक्का घेतला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.