Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली महापालिकेत शुक्रवारी सभापती निवडी, 'स्थायी'साठी भाजपमध्ये रस्सीखेच; कुणाची नावे शर्यतीत..जाणून घ्या

सांगली महापालिकेत शुक्रवारी सभापती निवडी, 'स्थायी'साठी भाजपमध्ये रस्सीखेच; कुणाची नावे शर्यतीत..जाणून घ्या

महापालिकेच्या स्थायी समितीसह विषय समित्यांच्या सभापतींची निवड शुक्रवार १३ मार्च रोजी होणार आहे. स्थायी समिती सभापतिपदासाठी भाजपमध्ये मोठी रस्सीखेच आहे. अतुल माने, ॲड. स्वाती शिंदे, गणेश माळी यांची नावे शर्यतीत आहेत.

तर महिला बालकल्याण, चार प्रभाग समिती व समाजकल्याण सभापतीपदी कुणाची वर्णी लागणार याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.

महापालिकेत भाजप व राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाची सत्ता आहे. सध्या महापौरपद भाजपकडे तर उपमहापौरपद राष्ट्रवादीकडे आहे. स्थायी समितीत भाजपचे ८, राष्ट्रवादी (अजित पवार) ३, काँग्रेस ४, राष्ट्रवादी (शरद पवार) १ असे संख्याबळ आहे. महायुतीत पहिली दोन वर्षे स्थायीचे सभापतीपद भाजपकडे तर तिसऱ्या व चौथ्या वर्षी राष्ट्रवादीला सभापतिपद देण्याचा अलिखित निर्णय झाला आहे. त्यानुसार पहिल्या वर्षी भाजपकडे सभापतीपद राहणार आहे.

भाजपमधून नव्याने निवडून आलेले अतुल माने, महिला मोर्चाच्या पदाधिकारी ॲड. स्वाती शिंदे, गणेश माळी यांच्या नावाची चर्चा आहे. त्यात आमदार सुधीर गाडगीळ यांनी अतुल माने यांच्या पारड्यात वजन टाकले आहे. तर स्वाती शिंदे यांनी महापौरपदासाठी फिल्डिंग लावली होती. पण आता किमान स्थायी सभापतिपदावर तरी वर्णी लागावी, अशी त्यांच्या समर्थकांची मागणी आहे. तर सांगली-कुपवाडला महत्त्वाची पदे देण्यात आल्याने सभापतिपद मिरजेला द्यावे, अशी मागणीही होत आहे.

महिला व बालकल्याण समिती भाजपचे ८, काँग्रेस ५ तर राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे ३ सदस्य आहेत. समितीवरही भाजपचेच वर्चस्व आहे. सभापतिपदीसाठी विद्या नलवडे, बानू जमादार, योगिता राठोड, लक्ष्मी सरगर यांची नावे चर्चेत आहेत. समाजकल्याण समिती सभापतीत भाजपचे ८ तर शिंदेसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचा प्रत्येकी एक सदस्य आहे. या समितीचे सभापतिपद शिंदेसेनेच्या वाट्याला जाण्याची शक्यता अधिक आहे. पण त्याचे गणित मिरज पंचायत समिती सभापतीवर अवलंबून आहे.

प्रभाग समितीवर महायुतीचे वर्चस्व

महापालिकेच्या चार प्रभाग समितीवर भाजप-राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे वर्चस्व आहे. प्रभाग समिती एकमध्ये भाजपचे १०, काँग्रेस ७, राष्ट्रवादी शरद पवार व शिंदेसेनेचे प्रत्येकी एक सदस्य आहे. प्रभाग समिती दोनमध्ये भाजप ६, काँग्रेस ७, राष्ट्रवादी (अजित पवार) ५, राष्ट्रवादी (शरद पवार) २ असे संख्याबळ आहे. प्रभाग समिती ३ मध्ये भाजपचे १४ तर राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे दोन तर प्रभाग समिती चारमध्ये भाजपचे ९, काँग्रेस ४ तर राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे १० सदस्य आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.