शिवसेना (शिंदे) आणि भाजपामध्ये सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीवरून वाद रंगला आहे. या निवडणुकीवेळी शिवसेनेचे नेते तथा मंत्री शंभूराज देसाई यांना धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप शिंदे सेनेकडून करण्यात आला आहे. या निवडणुकी दरम्यान झालेल्या गोंधळाचे पडसाद आज थेट विधीमंडळात उमटले आहेत.
शिवसेना (शिंदे) आणि भाजपामध्ये झालेल्या या वादावरून शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते अनिल परब यांनी शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षावर टीका करत डिवचलं आहे. अनिल परब यांनी शंभूराज देसाई यांचा अप्रत्यक्ष उल्लेख करत आता तुमचे वाघ कुठे गेले? मंत्री मार खातायेत अशी टीका केली. अनिल परबांनी केलेल्या या टीकेला शंभूराज देसाई यांनीही प्रत्युत्तर दिलं. मात्र, यावेळी शंभूराज देसाई यांनी केलेल्या एका वक्तव्याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.’भाजपाबरोबरच्या युतीत आम्हाला काही कटू अनुभव आले’, असं शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे.
शंभूराज देसाई काय म्हणाले?
“माझ्याबाबत अनिल परब यांनी काही उल्लेख केला. मंत्री सभागृहाच्या अध्यक्षांकडे संरक्षण मागत आहेत ही वस्तुस्थिती आहे. पण अनिल परब बोलताना म्हणाले की, आम्ही उठाव केला, कुठे गेला तुमचा स्वाभीमान वैगेरे. तेव्हा आम्ही उठाव करताना त्यांनी आम्हाला काय-काय शब्द वापरले होते? यांचे कोथळे बाहेर काढू वैगेरे. पण आम्ही त्यांना एवढंच सांगतो की तुम्ही विनाकारण आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही जी भूमिका घेतली ती हिंदुत्वासाठी घेतली”, असं शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे.
‘युतीमध्ये आम्हाला काही कटू अनुभव आले’
“शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी यांनी केलेली शिवसेना-भाजपा युती टिकवावी म्हणून आम्ही ती भूमिका घेतली. आता त्या युतीमध्ये आम्हाला कालच्या सारखे काही कटू अनुभव आले. पण ते सोडून द्या. ते योग्य त्या व्यासपीठावर आम्ही मांडू आणि ते दुरुस्त देखील होतील. पण अशा पद्धतीने आम्हाला कुठेही डिवचण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही वस्तुस्थिती निदर्शनास आणली याचा अर्थ आम्ही हदबल आहोत असं नाही”, असं शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केलं आहे.
अनिल परबांनी शिंदे सेनेच्या नेत्यांना डिवचलं
सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान पालकमंत्री शंभूराज देसाई यांना धक्काबुक्की झाल्याच्या आरोपावरून अनिल परबांनी शिंदे सेनेवर जोरदार टीका केली. अनिल परब म्हणाले की, "महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही जे घडलं नाही ते आज आम्हाला पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी सातारा जिल्हा परिषदेची जी निवडणूक झाली, या निवडणुकीत सत्ताधारी मंत्र्यांना पोलिसांनी मारहाण केली. सत्ताधारी मंत्रीच पोलिसांचा मार खातायेत. जर मंत्रीच मार खात असेल, आम्ही या घटनेकडे मंत्री म्हणून नाही तर सरकार म्हणून पाहत आहोत. या राज्यात मंत्री मार खात असतील, सत्तेतील कार्यकर्ते मार खात असतील, तर सर्वसामान्यांचं काय?", असा सवाल अनिल परब यांनी केला."काही दिवसांपूर्वी काहींनी उठाव केला. हा उठाव का केला गेला तर त्यांचा स्वाभीमान राष्ट्रवादी चिरडतेय. त्यासाठी सत्ता पालट केली, आम्ही वाघ आहोत असं सांगतात. मात्र, आज या राज्यात मंत्री मार खात आहेत. मंत्र्यांची एवढी वाईट परिस्थिती आहे की ते भारतीय जनता पक्षाचं नाव घेण्यासाठी ते घाबरतात. पोलीस तुम्हाला मारतात आणि तुम्ही गप्प बसता? मग तुमचा स्वाभीमान कुठे गेला? मला तर वाईट वाटतं की राष्ट्रवादीनेही मार खाल्लाय, म्हणजे फक्त शिवसेनाच (शिंदे गट) नाही तर राष्ट्रवादीनेही मार खाल्लाय. मंत्री मार खातायेत. सत्तेतील मंत्रीच मुख्यमंत्र्यांच्या विरोधात पायऱ्यावर आंदोलन करतात. जे स्वत:ला वाघ समजत होते, ते वाघ आता कुठे गेले? हे वाघ आता शेपटी घालून बसलेले आहेत. आता यांची भाजपाच्या विरोधात बोलण्याची हिंमत होत नाही", असं अनिल परब यांनी म्हटलं होतं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.