Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

डॉक्टर पतीनं आधी गळा दाबला अन् मग ५० किमी दूर जाऊन पत्नीसह कारला लावली आग; भयंकर हत्याकांड उघड

डॉक्टर पतीनं आधी गळा दाबला अन् मग ५० किमी दूर जाऊन पत्नीसह कारला लावली आग; भयंकर हत्याकांड उघड


सागर: मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात कारमध्ये जळून महिलेचा मृत्यू झाल्याचं समोर आले होते. मात्र या प्रकरणात भयंकर हत्याकांड उघड झाले आहे. जी घटना एखादा अपघात असल्याचं सांगितले जात होते, तो एक सुनियोजित हत्येचा कट असल्याचं तपासात उघड झाले. आरोपी डॉक्टर पतीने आधीच घरी पत्नीचा गळा दाबून खून केला होता. त्यानंतर पुरावे मिटवण्यासाठी त्याने ५० किलोमीटर दूर जाऊन कारवर पेट्रोल टाकून पत्नीसह तिला आग लावली.

माहितीनुसार, या घटनेतील मृत महिलेचं नाव सीमा कुर्मी असं आहे तर आरोपी पती डॉक्टर निलेश कुर्मी असं आहे. पोलिसांनी निलेशला २ साथीदार रामकृष्ण आणि शुभम यांच्यासह अटक केली आहे. तपासात मुख्य आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. २० मार्चच्या रात्री २ वाजता निलेश घरी परतला होता. रात्री उशिरा घरी आल्याने पत्नी सीमाने त्याला प्रश्न विचारले. ज्यातून या दोघांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात निलेशने सीमाचा गळा दाबला. त्यानंतर सीमा बेशुद्ध झाली, त्यामुळे आरोपी घाबरला आणि हे कृत्य लपवण्यासाठी त्याने षडयंत्र रचले. त्याने रामकृष्ण आणि शुभम या दोघांना बोलावून घेतले आणि सीमाला हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगत तिला घेऊन हॉस्पिटलला जायचे असल्याची बतावणी केली. त्यानंतर या तिघांनी सीमाला कारमध्ये बसवले.

हा प्रकार सुरू असताना मुलीला जाग आली. तिने आरोपीला विचारले असता त्याने आईला डॉक्टरकडे नेतोय, दरवाजा लाव असं सांगितले. त्यानंतर आरोपी सागरच्या दिशेने निघाला. रस्त्यात त्याने सासरे आणि मेहुण्याला फोन करून सीमाची तब्येत बिघडल्याचे सांगितले. परंतु षडयंत्र भलतेच काही होते. पहाटे ४ च्या सुमारास गढाकोटा रोडवरील चनाटोरियाजवळ निर्जनस्थळी कार पोहचली. त्याने कार बाजूला घेत पत्नीच्या शरीरावर आणि कारवर पेट्रोल टाकून दोघांना आग लावली. आग लागल्यानंतर तो साथीदारांसह तिथेच कार जळताना पाहत होता. कुणीही सीमाला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. या घटनेबाबत आरोपीने पोलीस आणि नातेवाईकांना वेगवेगळ्या कहाण्या सांगितल्या. कधी हार्ट अटॅक, कधी अपघात तर कधी सीएनजी ब्लास्ट...पोलिसांना सुरुवातीपासून या प्रकरणात संशय येत होता. घटनास्थळी जळालेली माचिस, कारची स्थिती आणि तांत्रिक तपासणीनंतर अनेक तथ्ये समोर आले आणि त्यातून या घटनेचा पर्दाफाश झाला.
तपासात काय झालं उघड?

पोलिसांनी घटनेचा तपास केला असता त्यात निलेशचे एका युवतीसोबत अफेअर सुरू असल्याचं समोर आले. ज्यातून पती पत्नी यांच्यात बराच काळापासून वाद होता. पत्नीने विरोध केल्यानंतर निलेशने तिचा काटा काढण्याचं ठरवले. पोलिसांनी आरोपीच्या घरचे सीसीटीव्ही फुटेज तपासले परंतु त्यात काही सापडले नाही. सीमाचा मृत्यू गळा दाबून झाला की जळाल्याने झाला याबाबत पोस्टमोर्टम रिपोर्टची वाट पाहिली जात आहे. सध्या या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी निलेशसह दोघांना अटक केली आहे. या तिघांविरोधात हत्या आणि पुरावे मिटवण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.