Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुण्यात मध्यरात्री थरार! 'रिक्षा का वळवली?' म्हणत शुल्लक कारणावरून पिस्तूल रोखलं अन् थेट गोळी झाडत.

पुण्यात मध्यरात्री थरार! 'रिक्षा का वळवली?' म्हणत शुल्लक कारणावरून पिस्तूल रोखलं अन् थेट गोळी झाडत.


पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरात किरकोळ  वादातून झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रिक्षा वळवण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हिंसक प्रकारात झाले आणि रिक्षा चालकावर देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी तातडीने कारवाई करत चार संशयित आरोपींना अटक केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, इब्राहिम उर्फ अज्जू अहमद शेख (वय 48) हे रिक्षा चालक 8 मार्चच्या मध्यरात्री कोंढव्यातील काकडे वस्ती परिसरातून जात होते. महापालिकेच्या क्रीडांगणाजवळ त्यांनी रिक्षा वळवली असताना समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराशी त्यांचा वाद झाला. सुरुवातीला हा वाद किरकोळ स्वरूपाचा होता, मात्र काही क्षणांतच परिस्थिती तणावपूर्ण झाली आणि दोन्ही बाजूंमध्ये बाचाबाची सुरू झाली.

या वादानंतर संतापलेल्या आरोपींनी रिक्षा चालकाला लक्ष्य करत देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळीबार केला. तसेच त्यांना तीक्ष्ण शस्त्रांचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. भररस्त्यात झालेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढला. त्यानंतर कुणाल उर्फ नन्या जाधव, आदित्य घावरे, अक्षय जावळे आणि शिवाजी मरगळे या चौघांना अटक करण्यात आली.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात हा वाद अचानक झालेल्या रस्त्यावरच्या भांडणातून वाढल्याचे समोर आले आहे. मात्र आरोपींनी थेट पिस्तूल काढून गोळीबार केल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. या टोळक्यातील इतर साथीदारांचा शोधही पोलिसांकडून सुरू आहे. भररस्त्यात अशा प्रकारे गोळीबार झाल्याने कोंढवा परिसरातील नागरिक आणि वाहनचालकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कोंढवा पोलीस करत असून आरोपींकडून शस्त्रांचा स्रोत आणि या घटनेमागील नेमका हेतू जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.