Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

माझे पती ज्योतिषी नाहीत.! अशोक खरातच्या पत्नीचा मोठा खुलासा; प्रकरणाला वेगळीच दिशा मिळणार?

माझे पती ज्योतिषी नाहीत.! अशोक खरातच्या पत्नीचा मोठा खुलासा; प्रकरणाला वेगळीच दिशा मिळणार?


शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या गंभीर आरोपाखाली अटकेत असलेला भोंदू बाबा अशोक खरात सध्या पोलीस कोठडीत आहे. पोलिसांच्या हाती खरातचे महिलांसोबतचे अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ लागले असतानाच, त्याच्या पत्नीने केलेल्या दाव्यामुळे या प्रकरणाची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे.
‘त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला’ असल्याचं अशोक खरातची पत्नी ‘कल्पना खरात’ यांनी म्हंटलं आहे. ‘हिंदुस्थान टाइम्स’शी बोलताना आपल्या पतीची बाजू सावरण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.  यावेळी बोलताना कल्पना खरात म्हणल्या की, “माझे पती कोणतेही व्यावसायिक ज्योतिषी नाहीत. त्यांच्या अत्यंत जवळच्या काही सहकाऱ्यांनीच त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून त्यांचा विश्वासघात केला आहे. केवळ त्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी हा कट रचण्यात आला असून त्यांना या प्रकरणात फसवले गेले आहे.” असं देखील त्यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, कुटुंबातील इतर सदस्यांनी आणि जवळच्या मित्रांनी अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसली, तरी कल्पना खरात यांच्या विधानामुळे तपासात काही नवे धागेदोरे मिळतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून स्थापन करण्यात आलेल्या एसआयटी (SIT) पथकाने आपला तपास अधिक तीव्र केला आहे. अशोक खरातच्या सतत संपर्कात असणाऱ्या व्यक्तींची यादी तयार lकरण्यात आली असून त्यांचे कॉल डिटेल्स तपासले जात आहेत.
“ज्या महिला खरातच्या अत्याचाराला बळी पडल्या आहेत, त्यांनी न घाबरता पुढे येऊन तक्रार द्यावी. पीडितांची नावे पूर्णपणे गोपनीय ठेवली जातील आणि त्यांना आवश्यक ते कायदेशीर संरक्षण दिले जाईल.” असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

'कॅप्टन' अशोक खरात प्रकरण : 

नाशिकमध्ये सध्या सर्वाधिक चर्चेत असलेले अशोक खरात प्रकरण दररोज नव्या खुलाशांमुळे अधिक गंभीर होत चालले आहे. स्वतःला 'कॅप्टन' म्हणवून घेणाऱ्या अशोक खरातवर महिलांवरील अत्याचार, ब्लॅकमेलिंग आणि आर्थिक गैरप्रकारांचे गंभीर आरोप समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.
अशोक खरात नाशिकमध्ये प्रॉपर्टीज अँड डेव्हलपर्स नावाचे कार्यालय चालवत होता. याच कार्यालयात अनेक महिलांना आमिष दाखवून त्यांच्यावर अत्याचार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश मात्र त्याच्याच कार्यालयातील एका कर्मचाऱ्यामुळे झाला. कार्यालयातील ऑफिस बॉयने सीसीटीव्ही फुटेज आपल्या ताब्यात घेतल्याने खरातच्या कथित कृत्यांचे पुरावे बाहेर आले, अशी माहिती तपासातून समोर आली आहे.

तपासादरम्यान महिलांशी संबंधित ५६ हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप्स अस्तित्वात असल्याची माहिती समोर आली. या क्लिप्सच्या आधारे खरातला ब्लॅकमेल करून मोठी खंडणी मागितल्याचाही आरोप आहे. खंडणी न मिळाल्यानंतर काही संशयितांनी पीडित महिलांनाच फोटो व व्हिडिओ पाठवून धमकावल्याचेही उघड झाले. यानंतर पीडितांनी पोलिसांकडे धाव घेतल्याने प्रकरण अधिकृतपणे समोर आले.

एका पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि तपासाची दिशा बदलली. या प्रकरणाचे धागेदोरे राजकीय व प्रभावशाली व्यक्तींशी जोडले जात असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर राज्याच्या कायदा व सुव्यवस्था विभागाने तातडीने एसआयटी स्थापन केली. या पथकाकडून आर्थिक व्यवहार, डिजिटल पुरावे आणि संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू आहे.
सध्या अशोक खरात अटकेत असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. अत्याचार, खंडणी, राजकीय प्रभाव आणि प्रशासनातील निर्णयप्रक्रिया या सर्व गोष्टींमुळे हे प्रकरण केवळ गुन्हेगारी चौकशीपुरते मर्यादित न राहता राज्यभर चर्चेचा विषय बनले आहे. पुढील तपासात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.