Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली :- पलूस हादरलं! शिक्षण संस्थेच्या संचालकाचा निर्घृण खून

सांगली :- पलूस हादरलं! शिक्षण संस्थेच्या संचालकाचा निर्घृण खून


पलूस (सांगली) : येथील पंडित विष्णू दिगंबर पलूसकर शिक्षण संस्थेचे संचालक संजय प्रभाकर परांजपे (वय ६०, रा. मारुती मंदिरजवळ) यांचा अनोळखींनी त्यांच्याच अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये निर्घृण खून केल्याचा प्रकार आज रात्री ८.४५ वाजता उघडकीस आला. रात्री उशिरापर्यंत पोलिस पंचनामा व तपास करत होते. संजय परांजपे यांच्या हत्येने पलूस शहर हादरले आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मारुती मंदिराजवळच  संजय परांजपे यांचा जुना वाडा आहे. वाड्यालगतच त्यांचे नवीन गजानन सदन नावाचे अपार्टमेंट आहे. तेथून सायंकाळी ५.३० वाजता ते श्री धोंडिराज महाराज मंदिरात दर्शनासाठी जातो म्हणून बाहेर पडले. परत आल्यानंतर अपार्टमेंटमध्ये असणाऱ्या पार्किंगमध्ये मोटारसायकल पार्क केली; मात्र मंदिरात गेलेले वडील घरी आले नाहीत म्हणून घरच्यांनी त्यांना फोन केला मात्र, ते उचलत नव्हते.
त्यांच्या मुलाला अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये रक्ताचा सडा दिसला. पुढे गेल्यानंतर संजय परांजपे जखमी अवस्थेत पार्किंगमध्येच एका कोपऱ्यात आढळले. मुलगा मंदार याने ओरडा केल्यानंतर शेजारी जमा झाले. त्यांनी पलूस पोलिसांना घटनेची माहिती दिली. पलूस पोलिसांनी पंचनामा केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला संजय परांजपे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. संजय परांजपे हे पंडित विष्णू दिगंबर पलूसकर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उदय परांजपे यांचे धाकटे बंधू होते. घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती. तेथे पोलिसांचा बंदोबस्त होता.

थोरल्या भावाला अश्रू अनावर
सांगली येथे राहणारे संजय परांजपे यांचे थोरले बंधू उदय परांजपे यांना घटनेची माहिती मिळताच तातडीने पलूस येथे रवाना झाले. तोपर्यंत संजय परांजपे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात नेला होता. ग्रामीण रुग्णालयात धाकट्या भावाचा मृतदेह पाहून उदय परांजपे यांनी हंबरडा फोडला. त्यांना अश्रू अनावर झाले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.