Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Breaking News! सांगलीच्या कारागृहात गँगवार, दोन टोळ्या आमने - सामने ; 16 जणांकडून दोन सराईत गुंडांना विटांनी बेदम मारहाण

Breaking News!सांगलीच्या कारागृहात गँगवार, दोन टोळ्या आमने - सामने ; 16 जणांकडून दोन सराईत गुंडांना विटांनी बेदम मारहाण


सांगली कारागृहातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कारागृहाच्या आवारातच दोन सराईत गुन्हेगारांच्या टोळ्यांमध्ये भीषण राडा झाला असून, १६ जणांच्या टोळीने दोन गुंडांना विटांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या वर्चस्ववादातून झालेल्या हाणामारीमुळे कारागृह प्रशासनाची मोठी धावपळ उडाली असून परिसरात खळबळ माजली आहे.

नेमकी घटना काय?
सांगली कारागृहातील खुल्या मैदानात कैद्यांना सोडण्यात आले असताना हा प्रकार घडला. जखमी झालेला पवन साळुंखे हा एक सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी 'एमपीडीए' (MPDA) अंतर्गत कारवाई करून त्याला एक वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे. त्याचा साथीदार मेघशाम ऊर्फ मोठ्या जाधव हा देखील गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याने या दोघांना सुरक्षेच्या कारणास्तव वेगळ्या बरॅकमध्ये ठेवण्यात आले होते.

दुसरीकडे, त्यांचे कट्टर विरोधक मानले जाणारे आदित्य पवार आणि त्याचे १६ साथीदार वेगवेगळ्या गुन्ह्यांखाली याच कारागृहात दुसऱ्या बरॅकमध्ये बंदिस्त आहेत. शनिवारी जेव्हा या दोन्ही टोळ्यांतील सदस्य कारागृहाच्या खुल्या मैदानात समोरासमोर आले, तेव्हा त्यांच्यात शाब्दिक चकमक सुरू झाली.
"स्वत:ला शहाणे समजता का?"

मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य पवारच्या टोळीने पवन साळुंखे आणि मेघशामला उद्देशून डिवचण्यास सुरुवात केली. "तुम्हाला वेगळ्या बरॅकमध्ये ठेवले आहे, म्हणून तुम्ही स्वतःला जास्त शहाणे समजता का?" असा सवाल करत १६ जणांच्या टोळीने त्यांना घेरले. यातून वादावादी वाढली आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. आदित्य पवारने आपल्या साथीदारांना ललकारत "यांना मारून टाका" असे आदेश दिले.

विटांनी केला थरारक पाठलाग
जिवाच्या भीतीने पवन आणि मेघशाम यांनी मैदानातून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, संख्येने जास्त असलेल्या १६ जणांच्या टोळीने त्यांचा पाठलाग केला. कारागृहाच्या आवारात पडलेल्या विटा उचलून या टोळीने दोघांवरही बेदम हल्ला चढवला. या हल्ल्यात पवन साळुंखे आणि मेघशाम ऊर्फ मोठ्या जाधव हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. अचानक झालेल्या या राड्यामुळे कारागृहात एकच गोंधळ उडाला. सुरक्षा रक्षकांनी मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

या घटनेनंतर सांगली शहर पोलिसांनी तातडीने दखल घेतली असून, हल्लेखोर १६ जणांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. कारागृहासारख्या सुरक्षित ठिकाणी अशा प्रकारे टोळीयुद्ध भडकल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.