देशातील फूड सर्व्हिस क्षेत्रावर सध्या संकटाचे सावट पसरले आहे. कमर्शियल एलपीजी सिलिंडरच्या तीव्र टंचाईमुळे हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसाय कोलमडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. बेंगळुरू, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांमध्ये गॅस पुरवठा विस्कळीत झाल्याने याचा थेट फटका शेअर बाजारातील दिग्गज फूड कंपन्यांच्या शेअर्सना बसला आहे.
संकट नेमके काय आहे?
५ मार्च रोजी सरकारने घरगुती गॅस पुरवठ्याला प्राधान्य देण्याचा आदेश दिला होता. या आदेशाची भाषा अस्पष्ट असल्याने वितरकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आणि त्यांनी कमर्शियल सिलिंडरचा पुरवठा थांबवला. 'नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया'च्या मते, रेस्टॉरंट्सकडे आता केवळ एक आठवड्याचा साठा उरला आहे. परिस्थिती सुधारली नाही तर अनेक रेस्टॉरंट्स बंद पडण्याची किंवा मेन्यू मर्यादित करण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शेअर बाजारातील पडझड
रेस्टॉरंट्स आणि फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म्सच्या व्यवसायावर परिणाम होण्याच्या भीतीने गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावला आहे.ज्युबिलंट फूडवर्क्स : ०.९८% घसरण.देवयानी इंटरनॅशनल : ०.०९% घसरण.एटरनल (झोमॅटो) : १% घसरण.वेस्टलाईफ फूडवर्ल्ड : यांसह इतर अनेक फूड क्षेत्रातील शेअर्स लाल निशाणात बंद झाले आहेत.
अमेरिका-कॅनडातून होणार आयात
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून केंद्र सरकार आता ॲक्शन मोडमध्ये आले आहे. सूत्रानुसार, गॅसची कमतरता भरून काढण्यासाठी अमेरिका आणि कॅनडा येथून अतिरिक्त एलपीजी आयात करण्याची तयारी सुरू आहे. तसेच, रेस्टॉरंट्स आणि ऑटो क्षेत्राच्या गरजांचा आढावा घेण्यासाठी पेट्रोलियम मंत्रालयाने एका विशेष समितीची स्थापना केली आहे.
उद्योगावर काय परिणाम होईल?
रेस्टॉरंट्स पूर्ण क्षमतेने चालली नाहीत, तर लाखोंच्या रोजगारावर गदा येऊ शकते. पुरवठा साखळीतील या अडथळ्यामुळे पुढील ३० ते ६० दिवसांत खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
