दुबईत अडकली बॉलिवूडची अभिनेत्री ; पोस्ट करत सांगितली तिथली खरी परिस्थिती 'PM सर, तातडीने मदत करा'
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे संपूर्ण मध्यपूर्वेत भीती आणि अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर संयुक्त हल्ला केल्याच्या वृत्तानंतर इराणनेही जशास तसे प्रत्युत्तर दिल्याची माहिती आंतरराष्ट्रीय माध्यमांतून समोर येत आहे. या तणावामुळे आशिया खंडात युद्धाचे काळे ढग दाटून आले असून, अनेक अरब राष्ट्रांनी उच्च सतर्कतेचा इशारा दिला आहे.
या पार्श्वभूमीवर दुबईजवळील अमेरिकन सैन्य तळांवर हल्ल्यांच्या घटना घडल्याचे वृत्त आहे. परिणामी, संयुक्त अरब अमिरातीतील सुरक्षेची परिस्थिती अधिकच तणावपूर्ण बनली आहे. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठ्या प्रमाणावर उड्डाणे रद्द करण्यात आली असून, विविध देशांकडे जाणाऱ्या आणि तेथून येणाऱ्या विमानसेवांवर परिणाम झाला आहे. हजारो नव्हे तर लाखो प्रवासी दुबईमध्ये अडकले असल्याची माहिती मिळत आहे. विमानतळ परिसरात मोठी गर्दी झाली असून, प्रवाशांमध्ये संभ्रम आणि भीतीचे वातावरण आहे. याच गोंधळात 'Jannat' फेम अभिनेत्री सोनल चौहान दुबई विमानतळावर अडकल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या निमित्ताने दुबईला गेलेल्या सोनलने सोशल मीडियावरून भारत सरकारकडे तातडीची मदत मागितली आहे. तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करत भावनिक आवाहन केले आहे.'आम्ही दुबईमध्ये अडकलो आहोत. येथे परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण आहे. कोणतीही उड्डाणे सुरू नाहीत. जी विमानसेवा नियोजित होती, ती रद्द करण्यात आली आहे. भारतात परत येण्यासाठी कोणताही मार्ग उपलब्ध नाही. कृपया आम्हाला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी तातडीने मदत करावी,' अशी विनंती सोनलने केली आहे. तिच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी आणि नेटकऱ्यांनी चिंता व्यक्त करत भारत सरकारने तत्काळ पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे. सोनल चौहानने 2008 साली प्रदर्शित झालेल्या 'जन्नत' या चित्रपटातून अभिनेता इमरान हाश्मीसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला आणि सोनलला मोठी लोकप्रियता मिळाली. त्याआधी 2005 मध्ये मलेशियात झालेल्या 'मिस वर्ल्ड टुरिझम' स्पर्धेत तिने किताब पटकावला होता. मॉडेलिंग क्षेत्रातून अभिनय क्षेत्रात आलेल्या सोनलने आपल्या सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर स्वतंत्र ओळख निर्माण केली.तिने बॉलिवूडबरोबरच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अलीकडेच ती Adipurush या चित्रपटात अभिनेता Prabhasसोबत झळकली होती. तसेच 'Mirzapur The Film' मध्ये तिची विशेष भूमिका असणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, दुबईतील परिस्थिती पाहता भारत सरकारकडून तेथे अडकलेल्या भारतीय नागरिकांसाठी विशेष विमानसेवा किंवा बचाव मोहीम राबवली जाईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचे संकेत मिळत असले तरी अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. दुबईतील तणाव निवळेपर्यंत प्रवाशांची चिंता कायम राहणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.