Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भोंदूबाबा अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

भोंदूबाबा अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी 


राज्यभरात खळबळ उडालेल्या नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाला आता नवीन वळण मिळाले आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून पोलीस कोठडीत असलेल्या अशोक खरातची मुदत आज संपल्याने त्याला कडक पोलीस बंदोबस्तात नाशिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेत अशोक खरातला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली जाणार आहे.

वैद्यकीय तपासणी आणि कारागृहात रवानगी
न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर पोलिसांनी अशोक खरातला तातडीने जिल्हा रुग्णालयात नेले आहे. तेथे त्याची सविस्तर वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता त्याची रवानगी नाशिक मध्यवर्ती कारागृहात केली जाणार आहे. गेल्या १४ दिवसांपासून विशेष तपास पथक (SIT) या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करत आहे. आज न्यायालयात हजर करण्यापूर्वीच्या शेवटच्या काही तासांतही SIT ने खरातची कसून चौकशी केली. या प्रकरणाचे धागेदोरे शोधण्यासाठी पोलिसांनी काल रात्री उशिरा खरातचा मुलगा हर्षवर्धन खरात यालाही ताब्यात घेऊन अटक केली आहे. बापाच्या या काळ्या कारनाम्यात मुलाचा नेमका सहभाग किती, याचा तपास आता पोलीस करत आहेत.
दुसऱ्या गुन्ह्यात उद्या पुन्हा कोठडीची मागणी?

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातला पहिल्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी मिळाली असली तरी अशोक खरातचा मुक्काम कारागृहात जास्त काळ राहण्याची शक्यता कमी आहे. शिर्डी येथील फसवणुकीच्या दुसऱ्या एका गुन्ह्यात अशोक खरात आणि त्याची पत्नी दोघेही आरोपी आहेत. या दुसऱ्या गुन्ह्यात पोलीस त्याला उद्या पुन्हा अटक दाखवून न्यायालयासमोर हजर करणार आहेत. त्यामुळे उद्या पुन्हा त्याला पोलीस कोठडी मिळते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच अशोक खरातची पत्नी कल्पना खरात ही देखील या गुन्ह्यांमध्ये तितकीच सहभागी असल्याचे समोर आले आहे. मात्र, पोलिसांची कुणकुण लागताच ती फरार झाली असून पोलीस पथके तिचा शोध घेत आहेत.

अनेक मोठे मोठे मासे गळाला लागणार
अशोक खरात हा स्वतःला आध्यात्मिक गुरू भासवून महिलांना देवाचा कोप होण्याची भीती घालत असे. या भीतीचा गैरफायदा घेऊन त्याने अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त केले होते. एसआयटीकडून खरातच्या मालमत्तेची आणि त्याने जमवलेल्या संपत्तीचीही चौकशी सुरू आहे. आतापर्यंत अशोक खरातला दोन टप्प्यांत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. यातील १८ ते २४ मार्च या पहिल्या टप्प्यात त्याची प्राथमिक चौकशी करण्यात आली, तर २५ ते २९ मार्च या दुसऱ्या टप्प्यात एसआयटीने त्याच्या आर्थिक व्यवहारांची आणि खंडणीच्या प्रकरणांची सखोल चौकशी केली. या काळात पोलिसांनी खरातच्या आश्रमातून आणि निवासस्थानातून महत्त्वाचे पुरावे हस्तगत केले आहेत. त्यामुळे अशोक खरातप्रकरणी अनेक मोठे मोठे मासे गळाला लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.