Big Breaking सांगलीत खाकीचा धाक संपला? अवैध धंद्यांचा महापूर; 'व्हाईट कॉलर' माफियांच्या विळख्यात शहर!
सांगली-मिरज-कुपवाड या तीन शहरांच्या संगमावर सध्या विकासाच्या गप्पा मारल्या जात असल्या, तरी वास्तवात मात्र या शहरांना अवैध धंद्यांच्या विळख्याने पार पोखरून काढले आहे. मटका, जुगार, बेकायदा सावकारी आणि आता तर चक्क अंमली पदार्थांच्या तस्करीचा 'महापूर' शहरात आला असून, प्रशासनाच्या नाकाखाली हे सर्व राजरोस सुरू असल्याने सर्वसामान्य जनतेतून संताप व्यक्त होत आहे.
गल्लोगल्ली मटका आणि जुगाराचे अड्डे: शहराच्या मध्यवस्तीत आणि उपनगरांमध्ये मटक्याचे अड्डे आता 'ऑनलाईन' आणि 'ऑफलाईन' अशा दोन्ही पद्धतींनी फोफावले आहेत. तरुण पिढी या विळख्यात अडकत चालली असून अनेक संसार उद्ध्वस्त होत आहेत.बेकायदा सावकारीचा विळखा: सामान्य व्यापारी आणि कष्टकरी वर्गाला जाळ्यात ओढून त्यांच्याकडून व्याजाचे अव्वाच्या सव्वा पैसे वसूल करणारी टोळी शहरात सक्रिय झाली आहे. यातूनच खंडणी आणि मारहाणीचे प्रकार वाढले आहेत.
अंमली पदार्थांची छुप्या मार्गाने विक्री: मिरज रेल्वे जंक्शन आणि सांगलीतील काही हायप्रोफाईल भागांमध्ये अंमली पदार्थांची विक्री होत असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. कॉलेजमधील तरुण मुले या तस्करीचे सोपे सावज ठरत आहेत.
प्रशासकीय यंत्रणा सुस्त की 'अर्थ'पूर्ण दुर्लक्ष?
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, हे सर्व अवैध धंदे सुरू असताना पोलीस आणि स्थानिक प्रशासन मात्र डोळे झाकून बसले आहे की काय, असा सवाल उपस्थित होत आहे. अनेकदा धाडी टाकल्याचा बनाव केला जातो, मात्र काही तासांतच हे अड्डे पुन्हा 'जैसे थे' सुरू होतात. यामुळे "पोलिस प्रशासनाचे या माफियांसोबत अर्थपूर्ण संबंध आहेत का?" अशी शंका आता नागरिक उघडपणे बोलून दाखवत आहेत.
बड्या राजकीय धेंडांचे अभय?
मिळालेल्या माहितीनुसार, या अवैध धंद्यांच्या मुळाशी काही 'व्हाईट कॉलर' नेते आणि त्यांचे कार्यकर्ते असल्याचे समजते. निवडणुकीच्या फंडातून आणि हप्त्यातून मिळणाऱ्या पैशांमुळे या गुन्हेगारांना राजकीय अभय मिळत असल्याने पोलिसांचे हात बांधले गेल्याची चर्चा आहे.
आता तरी 'सळसळतं' रक्त जागे होणार का?
शहरातील शांतता आणि सुव्यवस्था धोक्यात आली आहे. जर वेळीच या अवैध धंद्यांचा बंदोबस्त केला नाही, तर सांगली जिल्ह्याची ओळख 'गुन्हेगारांचे नंदनवन' म्हणून व्हायला वेळ लागणार नाही. आता यावर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक कोणती ठोस कारवाई करतात, की हा 'महापूर' असाच शहराला गिळंकृत करत राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. "सांगलीची संस्कृती बिघडवणाऱ्या या प्रवृत्तींना वेळीच ठेचले पाहिजे. पोलीस केवळ छोटे मासे पकडतात, पण मगरमच्छ मोकाट आहेत."
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.