दिल्ली : अंदमान समुद्रात रोहिंग्या निर्वासित आणि बांगलादेशी नागरिकांना घेऊन जाणारी एक बोट उलटल्यामुळे, सुमारे 250 नागरिक बेपत्ता झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. संयुक्त राष्ट्रांनी (UN) या दुर्घटनेबाबत आज (15 एप्रिल) माहिती दिली आहे. एका निवेदनात संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासित उच्चायुक्तांनी (UNHCR) सांगितले की, दुर्घटनाग्रस्त बोट दक्षिण बांगलादेशातील 'टेकनाफ' येथून मलेशियाच्या दिशेने निघाली होती. परंतु सोसाट्याचा वारा, खवळलेला समुद्र आणि बोटीवर क्षमतेपेक्षा जास्त नागरिक असल्यामुळे ही बोट बुडाली.
प्राथमिक माहितीनुसार, 4 एप्रिल रोजी बांगलादेशातून निघालेल्या या बोटीवर सुमारे 280 नागरिक प्रवास करत असल्याचे समोर आले आहे. मात्र चार दिवसांनंतर बोट उलटली आणि त्यातील 30 जणांना वाचविण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मात्र अद्यापही 250 नागरिक बेपत्ता आहेत, ज्यामध्ये अनेक लहान मुलांचाही समावेश आहे. धक्कादायक म्हणजे या बोटीवर मोठ्या संख्येने रोहिंग्या नागरिक उपस्थित होते, अशी माहिती समोर येत आहे. या बोटीवरील रोहिंग्या निर्वासित हे बांगलादेशातील 'कॉक्स बाजार' येथे असलेल्या विशाल छावण्यांमधून पळून जाण्याचा प्रयत्न करत असावेत, अशी शक्यता वर्तवली जात आहे. कारण या छावण्यांमध्ये म्यानमारच्या 'राखिन' प्रांतातून विस्थापित झालेले दहा लाखांहून अधिक निर्वासित अत्यंत दयनीय अवस्थेत जीवन जगत आहेत.बांगलादेश तटरक्षक दलाने (BCG) दिलेल्या माहितीनुसार, 9 एप्रिल रोजी इंडोनेशियाच्या दिशेने निघालेल्या त्यांच्या एका बोटीने समुद्रातून नऊ लोकांना वाचवले. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. बीसीजीचे प्रवक्ते लेफ्टनंट कमांडर सब्बीर आलम सुजान यांनी एका बांगलादेशी वृत्तसंस्थेला सांगितले की, बांगलादेशाचा ध्वज असलेल्या 'एम.टी. मेघना प्राईड' (M.T. Meghna Pride) या बोटीला अंदमान बेटांजवळच्या खोल समुद्रात काही लोक तरंगताना दिसले आणि त्यांनी त्या सर्वांना वाचवले. त्यानंतर वाचवण्यात आलेल्या या लोकांना बांगलादेश तटरक्षक दलाच्या 'मन्सूर अली' (Mansoor Ali) या गस्ती जहाजाच्या स्वाधीन करण्यात आले.
बोट दुर्घटनेतून वाचलेल्या रफीकुल इस्लाम (वय 40) यांनी सांगितले की, तस्करांनी मलेशियामध्ये नोकऱ्या मिळवून देण्याचे आमिष दाखवून आम्हाला बोटीवर चढवले होते. गस्ती पथकांच्या दृष्टीस पडू नये म्हणून तस्करांनी मला बोटीवरील अतिशय लहानशा जागेत लपायला भाग पाडले. जिथे श्वास घेणेही अवघड जात होते. मात्र चार दिवसांच्या प्रवासानंतर बोट उलटली आणि त्यानंतर मी सुमारे 36 तास समुद्रातच तरंगत होतो.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.