धक्कादायक वास्तव! राज्यातील ५० टक्के डॉक्टर मानसिक तणावाच्या विळख्यात; संघटनेने व्यक्त केली मोठी चिंता.
नागपर : राज्यातील शासकीय आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांतील रुग्णसेवेचा डोलारा सांभाळणारे निम्मे निवासी डाॅक्टर विविध कारणाने मानसिक ताणतणावात राहतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे. फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनच्या निरीक्षणात ही बाब पुढे आली आहे.दरम्यान फेडरेशनच्या निरीक्षणात आणखी काय गंभीर विषय पुढे आले, त्याबाबत आपण जाणून घेऊ या.
काय आहे निरीक्षण
राज्यातील बहुतांश शासकीय आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्नित रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग, वॉर्ड आणि शल्यक्रिया गृहामध्ये निवासी डॉक्टर सतत कार्यरत असतात. कामाचे तास निश्चित नसल्यामुळे अनेकदा त्यांना सलग ४८ तास काम करावे लागते. यासोबतच वरिष्ठ आणि प्राध्यापकांकडून होणारी ओरड, दबाव आणि मानसिक छळ यामुळे ताणतणाव वाढतो. या तणावाखाली ते शिक्षण घेत आहेत. यामुळे अनेक निवासी डॉक्टर नैराश्यात जात आहेत. तर काही मद्यपानाचा आधार घेत असल्याचेही दिसून आले आहे. काहींनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याच्या घटनाही राज्यात घडल्या असल्याचे 'फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन'च्या हेल्पलाईनद्वारे करण्यात आलेल्या अभ्यासातून समोर आले आहे. या गंभीर गोष्टीकडे लक्ष न दिल्यास पुढे स्थिती आणखी वाईट होण्याचा धोका टाळता येत नसल्याचे फेडरेशनकडून सांगण्यात येते.
प्रबंध सादरीकरणावेळी वाढतो छळ
पदव्युत्तर (एमडी) अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात प्रबंध सादरीकरणाच्या काळात मानसिक छळाचे प्रमाण वाढते. प्रबंध मंजुरीसाठी काही प्राध्यापकांकडून आर्थिक मागण्या, महागड्या वस्तू किंवा वैयक्तिक खर्च भागवण्याचा दबाव टाकला जात असल्याचे निवासी डॉक्टरांनी हेल्पलाईनद्वारे सांगितले आहे. हा अहवाल सुमारे चार महिन्यांपूर्वीचा आहे. हा त्रास विद्यार्थ्यांसोबतच विद्यार्थींनींनाही दिला जात असल्याचेही निरीक्षण फेडरेशनकडून नोंदवण्यात आले आहे.निवासी डॉक्टरांची संख्याविवरण संख्याशासकीय महाविद्यालये ७,९००अर्ध-शासकीय महाविद्यालये २,५००खासगी/अभिमत विद्यापीठे १,५००"राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये निवासी डॉक्टरांना बऱ्याचदा २४ तास सेवा द्यावी लागते. त्यामुळे डाॅक्टरांना गरजेच्या तुलनेत पुरेशी झोप मिळत नाही. निवासी डाॅक्टरांच्या कामाचे तास निश्चित नसल्यामुळे ताणतणावात वाढ होते. फेडरेशनच्या हेल्पलाईनच्या अभ्यासातून ५४ टक्के निवासी डॉक्टर मानसिक आरोग्याची जोखीम स्वीकारून काम करत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे."- डाॅ. सजल बंसल, महाराष्ट्र समन्वयक, फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.