Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​"सरकारी कर्मचाऱ्यांनो लक्ष द्या! मार्च २०२७ पर्यंत बदल्या रखडणार; केंद्र सरकारचा मोठा निर्णय"

​"सरकारी कर्मचाऱ्यांनो लक्ष द्या! मार्च २०२७ पर्यंत बदल्या रखडणार; केंद्र सरकारचा मोठा निर्णय"


परळी वैजनाथः सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना ३१ मार्च २०२७ पर्यंत स्थगिती देण्यात आलेली आहे. केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांनी याबाबतचे निर्देश दिले आहेत. देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना यासंदर्भात पत्र पाठवण्यात आलेलं आहे.

केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांनी या पत्रात म्हटले आहे की, देशात आगामी जनगणनेची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. विशेष म्हणजे ही जनगणना पूर्णपणे डिजिटल स्वरूपात होणार असून, नागरिकांना 'स्वयं-गणनेची' सुविधाही उपलब्ध असणार आहे. ही प्रक्रिया दोन टप्प्यांत होणार आहे. पहिला टप्पा घरनोंदणी आणि घरांची गणना असा असेल. एप्रिल ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत राज्य सरकारने निश्चित केलेल्या ३० दिवसांच्या कालावधीत हा टप्पा पूर्ण केला जाणार आहे तर दुसरा टप्पा प्रत्यक्ष लोकसंख्येची गणना आहे. दुसरा टप्पा फेब्रुवारी २०२७ मध्ये राबवला जाईल.

सध्या राज्य, जिल्हा, तहसील आणि प्रगणक गट स्तरावर जनगणना अधिकार्‍यांच्या नियुक्तीची प्रक्रिया बहुतांश राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरू झाली आहे. या कर्मचार्‍यांचे प्रशिक्षणही सुरू करण्यात आले आहे. जनगणना कायदा १९४८ आणि जनगणना नियम १९९० अंतर्गत या अधिकार्‍यांना अत्यंत महत्त्वाची आणि वैधानिक कर्तव्ये पार पाडावी लागतात. त्यामुळे एकदा अधिकार्‍यांची नियुक्ती झाल्यानंतर जनगणनेची संपूर्ण प्रक्रिया संपेपर्यंत त्यांना त्यांच्या पदावरून हटवले जाऊ नये, अशी स्पष्ट भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे.

जनगणनेच्या या राष्ट्रीय कार्यात कोणताही प्रशासकीय व्यत्यय येऊ नये, यासाठी राज्यांच्या मुख्य सचिवांनी आपापल्या स्तरावर याबाबतचे तातडीने आदेश काढावेत. 'जनगणना २०२७' साठी नियुक्त केलेल्या कोणत्याही कर्मचार्‍याची ही जनगणना पूर्ण होईपर्यंत म्हणजे ३१ मार्च २०२७ पर्यंत बदली केली जाणार नाही. याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे गृहसचिव गोविंद मोहन यांनी या पत्रात नमूद केले आहे. यामुळे यंदा जनगणनेसाठी नियुक्त केलेल्या शिक्षक, कर्मचार्‍यांच्या बदल्या जनगणनेचे काम पूर्ण होईपर्यंत होणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.