Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पाकिस्तानी ब्युटी क्रीमचा विळखा: नागपुरात १८ महिलांची किडनी निकामी, प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन

पाकिस्तानी ब्युटी क्रीमचा विळखा: नागपुरात १८ महिलांची किडनी निकामी, प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन

नागपूर : पाकिस्तानमधून आलेल्या आणि झटपट 'गोरी' बनवण्याचा दावा करणाऱ्या सौंदर्य क्रीमचा धुमाकूळ राज्यातील अनेक भागांत सुरू आहे. या क्रीममुळे अनेक महिलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत.

या क्रीमच्या वापरामुळे संबंधितांमध्ये मूत्रपिंडाचे विकार निर्माण होत असून काहींचे मूत्रपिंड निकामी झाल्याचे प्राथमिक वैद्यकीय तपासणीत समोर आले आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरनंतर आता नागपुरातही अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने विविध ठिकाणी छापे टाकून हे क्रीम जप्त केले आहे.

दोन वर्षांत नागपुरातील १८ महिलांना मूत्रपिंडाचा आजार

नागपुरातील एका रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात गेल्या दोन वर्षांत तब्बल १८ महिलांना या क्रीमच्या वापरामुळे मूत्रपिंडाचे विकार झाल्याचे निदर्शनास आले आहे. मूत्रपिंड व त्वचारोग तज्ज्ञांच्या मते, या क्रीममध्ये 'पारा'चे प्रमाण अत्यंत जास्त असते. त्वचेवर लावल्यावर हा विषारी घटक शरीरात शिरून रक्तामध्ये मिसळतो आणि थेट मूत्रपिंडावर परिणाम करतो. दीर्घकाळ वापर केल्यास हा परिणाम जीवघेणाही ठरू शकतो.

एफडीएकडून बाजारात सर्रास विक्री होणारे क्रीम जप्त

नागपुरात या क्रीमची खुलेआम विक्री सुरू असल्याचे समोर आल्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाने मोठी कारवाई करत विविध ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत मोठ्या प्रमाणात संशयित क्रीम जप्त करण्यात आली असून त्यांचे नमुने पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

जप्त क्रीममध्ये अनेक प्रकारांचा समावेश

एफडीएच्या कारवाईत मल्लिका, झलक, गोरे, गोल्डन पर्ल, चांदणी, उजूबा, फेस फ्रेश, नूर हर्बल, न्यू फेस यांसारख्या विविध क्रीम जप्त करण्यात आल्या. तसेच काही साबण आणि व्हिटॅमिनयुक्त द्रव्यांचाही साठा आढळून आला आहे.

क्रीमचा फक्त त्वचेवरच नाही तर मूत्रपिंडांवरही धोका

या क्रीमचा वापर करणाऱ्या काही तरुण-तरुणींनी त्वचेवर जळजळ, डाग, सूज यांसारख्या समस्या निर्माण झाल्याचे सांगितले आहे. मात्र, याहून गंभीर बाब म्हणजे या क्रीममुळे किडनीचे कार्य बिघडत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. सुरुवातीला परिणाम जाणवत नसला तरी पुढे हा विकार गंभीर रूप धारण करू शकतो.

तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे काय?

त्वचारोग तज्ज्ञांच्या मते, अशा क्रीममुळे कायमस्वरूपी गोरेपणा मिळत नाही. उलट त्वचा नाजूक होते, संसर्ग वाढतो आणि शरीरातील अंतर्गत अवयवांवर घातक परिणाम होतो. डॉक्टरांचा सल्ला न घेता कोणतेही सौंदर्यप्रसाधन वापरणे टाळावे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.