राज्यभर अवैध मद्यविक्री, मग कारवाई आमच्यावरच का? सोलापुरात ढाबा चालकांचा राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांवर हल्ला
सोलापूर : उपळाई हद्दीतील (ता. माढा) येडेश्वरी ढाब्यावर अवैध मद्यविक्री सुरू असल्याची खबर राज्य उत्पादन शुल्क विभागाला टोल फ्री क्रमांकावर मिळाली होती. त्याठिकाणी कारवाईसाठी गेल्यावर ढाबा मालकाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी, अंमलदारासमवेत वाद घातला. त्यावेळी झालेल्या मारहाणीत उपनिरीक्षक अमित नागरे, अंमलदार युवराज टिळे हे दोघे जखमी झाले आहेत.
जगदंबा व येडेश्वरी या ढाब्यांवर अवैध मद्यविक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर बुधवारी (ता. २२) रात्री साडेआठच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक त्याठिकाणी गेले होते. त्यावेळी येडेश्वरी ढाब्याचे मालक प्रमोद गोरे पाटील ऊर्फ गोट्या याने पथकातील अधिकाऱ्यांसमवेत वाद घातला. 'राज्यात सगळीकडे ढाब्यांवर मद्यविक्री, तरी आम्हीच दिसतो का, तुम्ही आमच्याच ढाब्यावर कसे येता' असे तो म्हणत होता. यापूर्वीही त्याच्याविरुद्ध असेच दोन गुन्हे दाखल आहेत. बुधवारी त्याने गावातील नातेवाईकांना, मित्रांना बोलावून घेऊन गोंधळ घातला.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्लास्टिक पाईपने मारहाण केली. तत्पूर्वी, गोंधळ सुरू असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अंमलदार मोबाईलमध्ये व्हिडिओ शुटिंग काढत होते. त्यांचा मोबाईल त्याने काढून घेतला, तो परत दिलाच नाही. त्याठिकाणी झालेल्या मारहाणीत दोघे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. उपनिरीक्षक नागरे यांच्या डोक्याला जखम झाली आहे.
वाद घालून मारहाण करणाऱ्यांविरुद्ध फिर्याद
मारहाण प्रकरणी संबंधितांविरुद्ध माढा पोलिसांत शासकीय कामांत अडथळा आणल्याची फिर्याद देत आहोत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी दिली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.