चंद्रपूर ता.४ : शहरातील तुकूम परिसरात लिव्ह-इन मध्ये राहणाऱ्या एका २९ वर्षीय तरुणीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुरुवातीला आत्महत्येचा संशय व्यक्त करण्यात आलेल्या या प्रकरणात तपासादरम्यान खून झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर दुर्गापूर पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली आहे.
मृत तरुणी प्रियंका शंकर वांढरे (वय २९, रा. वानखेडे वाडी, तुकूम) हिचा मृत्यू १४ मार्च रोजी रात्री झाला. घटनेनंतर प्रथमदर्शनी आत्महत्येची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, मर्ग क्रमांक १३/२०२६ अंतर्गत पोलिसांनी केलेल्या चौकशीत आणि शवविच्छेदन अहवालातून हा प्रकार खून असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांच्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी पतीपासून विभक्त झाल्यानंतर प्रियंका हिची ओळख अंकेश योगेश बहीरवार (वय २२, रा. सोनापूर, ता. सावली) याच्याशी झाली होती. त्यानंतर दोघेही तुकूम येथे एकत्र राहत होते.घटनेच्या दिवशी आरोपीने मृतकच्या वडिलांना फोन करून "ती बोलत नाही" अशी माहिती दिली. कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले असता प्रियंका बेशुद्ध अवस्थेत आढळली. गळ्यावर व्रण दिसल्याने संशय अधिक गडद झाला. तिला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती मृत घोषित केले. घटनास्थळी पंचनामा करताना इलेक्ट्रॉनिक प्रेस व एक्स्टेंशन बोर्डची वायर आढळून आली असून ती पोलिसांनी जप्त केली आहे.शवविच्छेदन अहवालात दोरीसदृश वस्तूने गळा आवळणे तसेच हाताने गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. यानंतर मृतकच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी अंकेश बहीरवार याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नरेश उरकुडे करीत असून, अपर पोलीस अधीक्षक गौरव कायदेपंडित यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.