Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

संयमाचा 'जयंत' विजय! चंद्रकांतदादांच्या जहरी टीकेला जयंत पाटलांचे हात जोडून प्रत्युत्तर.

संयमाचा 'जयंत' विजय! चंद्रकांतदादांच्या जहरी टीकेला जयंत पाटलांचे हात जोडून प्रत्युत्तर.


सांगली : सांगली जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीनं आपला झेंडा रोवला आहे. मात्र, सभापती निवडीवेळी चमत्कार दाखवण्यात येईल, असं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून सांगण्यात आलं होतं. मात्र, आता शिंदेंच्या शिवसेनेचे दोन सदस्य फुटले असून सभापती निवडीतही महाविकास आघाडीनं बाजी मारली आहे. हेच दोन सदस्य अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवेळीही गैरहजर होते. त्यावरून चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) नेते, आमदार जयंत पाटील यांच्यावर टीका केली होती. आता चंद्रकांत पाटलांनी केलेल्या टीकेबद्दल विचारल्यावर जयंत पाटील यांनी हात जोडले आहेत.
सांगली जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीनं आपली सत्ता आणली असून भाजपला सत्तेबाहेर बसावे लागले आहे. राज्यात सत्तेत मित्रपक्ष असलेल्या शिंदेसेनेच्या दोन सदस्यांनी देखील अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद निवडीवेळी गैरहजेरी लावली होती. मात्र, आता सभापती निवडीवेळी हे सदस्य भाजपला मदत करतील, अशी अपेक्षा चंद्रकांत पाटलांना होती.
त्यावरून 'पिक्चर अभी बाकी है' असे सांगत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा परिषद सभापती निवडीची रणनीती अंतिम क्षणी निश्‍चित केली जाईल, असे मंगळवारी सांगितलं होतं. तसेच, अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवेळी शिंदेंच्या शिवसेनेचे दोन सदस्य पृथ्वीराज पाटील आणि जयदीप भोसले हे गैरहजर राहिल्याबद्दल चंद्रकांत पाटलांना प्रश्न विचारण्यात आला.
त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, "आमदार सुहास बाबर आणि जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील यांच्यात बिब्बा घालण्याचे काम जयंत पाटील यांनी केले आहे. जिथे जिथे शक्य आहे, तिथे बिब्बा टाकायचा, हा त्यांचा इतिहास आहे." चंद्रकांत पाटलांनी केलेल्या टीकेबद्दल जयंत पाटलांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर जयंत पाटल यांनी म्हटलं, "चंद्रकांत पाटील हे माझे हितचिंतक आहेत. त्यांच्याबद्दल बोलायची नाही, ही भूमिका मी कायम ठेवली आहे. माझ्याकडून काही भाष्य केले जाणार नाही." असं म्हणत जयंत पाटलांनी हात जोडले.
दरम्यान, आज १ एप्रिलरोजी सांगली जिल्हा परिषद सभापतींची निवड पार पडली. त्यावेळी शिंदे सेनेच्या दोन्ही सदस्यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दर्शवला. पृथ्वीराज पाटील यांची बांधकाम सभापती निवड झाली आहे. दुसरीकडे महायुतीकडून सभापती निवडीसाठी अर्जच दाखल करण्यात आला नाही. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.