बेंगळुरू: आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेंगळुरूमध्ये एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने आपल्याच कंपनीला लाखो रुपयांचा चुना लावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कंपनीचे कॉर्पोरेट क्रेडिट कार्ड वापरून 27 लाख रुपयांहून अधिक रक्कमेचा अपहार केल्याचा आरोप या कर्मचाऱ्यावर ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे जेव्हा कंपनीने जाब विचारला तेव्हा या कर्मचाऱ्याने वरिष्ठ व्यवस्थापनाला अश्लील साहित्य पाठवून धमकावल्याचाही प्रकार घडला आहे.
2 लाखांची मर्यादा अन् 27 लाखांचा खर्च
संबंधित कर्मचाऱ्याला कंपनीने अधिकृत कामाच्या खर्चासाठी एक कॉर्पोरेट क्रेडिट कार्ड दिले होते, ज्याची मर्यादा 2 लाख रुपये होती. मात्र ऑक्टोबर 2023 ते जानेवारी 2024 या चार महिन्यांच्या कालावधीत या कार्डवरून तब्बल 27,01,139 रुपयांचे अनधिकृत व्यवहार झाल्याचे कंपनीच्या अंतर्गत आर्थिक तपासणीत उघड झाले. नियमापेक्षा कितीतरी पटीने जास्त खर्च झाल्याने कंपनीचे धाबे दणाणले.
चीन आणि पाकिस्तानमधून धमक्या
या आर्थिक गैरव्यवहाराबाबत कंपनीने 12 जानेवारी 2024 रोजी ईमेलद्वारे स्पष्टीकरण मागितले होते. 15 जानेवारीला उत्तर देताना कर्मचाऱ्याने पैशांचा गैरवापर केल्याची कबुली दिली. मात्र त्याने एक विचित्र दावा केला. चीन आणि पाकिस्तानमधील काही अज्ञात व्यक्तींकडून आपल्याला धमक्या येत होत्या आणि त्यांच्या दबावाखाली येऊनच हे व्यवहार करावे लागले, असे त्याने कंपनीला सांगितले. तसेच हा सर्व पैसा टप्प्याटप्प्याने परत करण्याचे आश्वासनही त्याने दिले.
परतफेडीचे आश्वासन ठरले खोटे
कर्मचाऱ्याने 29 जानेवारीला कंपनीला कळवले की तो फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत 10 लाख रुपये भरेल आणि उर्वरित रक्कम त्यानंतर हळूहळू परत करेल. कंपनीने त्याच्या शब्दावर विश्वास ठेवून त्याला वेळ दिला. मात्र दिलेली मुदत संपूनही त्याने एक रुपयाही परत केला नाही. कंपनीने वारंवार संपर्क साधूनही त्याने प्रतिसाद दिला नाही.
अश्लील साहित्य आणि आत्महत्येची धमकी
9 फेब्रुवारी 2024 रोजी या प्रकरणाने गंभीर वळण घेतले. पैसे परत करण्याऐवजी या कर्मचाऱ्याने आपल्या मॅनेजरला अश्लील फोटो पाठवले. इतकेच नाही तर त्याने संवादादरम्यान आत्महत्येची धमकी देऊन कंपनीला कायदेशीर कारवाई करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे घाबरलेल्या कंपनीने अखेर पोलिसांत धाव घेतली.
पोलिसांत गुन्हा दाखल
कंपनीच्या तक्रारीवरून बेंगळुरूच्या वर्थूर पोलीस ठाण्यात प्रथम माहिती अहवाल (FIR) नोंदवण्यात आला आहे. पोलीस सध्या त्या क्रेडिट कार्डद्वारे झालेल्या सर्व व्यवहारांची चौकशी करत आहेत. तसेच कर्मचाऱ्याने चीन आणि पाकिस्तानमधील धमक्यांबाबत केलेला दावा खरा आहे की निव्वळ बनाव याचाही शोध घेतला जात आहे. या धक्कादायक घटनेमुळे कॉर्पोरेट वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.