'ज्योतीने तेजाची आरती': देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या जीवनावरील 'भारताची प्रतिभा' पुस्तकाचे पुण्यात प्रकाशन
पुणे: भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या गौरवशाली जीवनप्रवासावर आधारित 'भारताची प्रतिभा' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा २० एप्रिल रोजी पुण्यात उत्साहात पार पडला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात झालेल्या या कार्यक्रमात राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांनी प्रतिभाताईंच्या पाच दशकांच्या निकलंक कारकिर्दीला उजाळा दिला.
दिग्गजांची उपस्थिती आणि कौटुंबिक स्नेह
या सोहळ्याला सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शांताराम मुजुमदार, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे आणि श्री. राजन पांडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष जरांडे यांनी केले.
विशेष म्हणजे, या पुस्तकाची संकल्पना आणि निर्मिती प्रतिभाताईंच्या कन्या सौ. ज्योती जयेश राठोड यांनी केली आहे. ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी आपल्या लेखात या सोहळ्याचे वर्णन ‘ज्योतीने तेजाची आरती’ असे केले असून, आईच्या आजारपणात तिची सेवा करणाऱ्या आणि वडिलांच्या (डॉ. देवीसिंह शेखावत) निधनानंतर मातोश्रींना आधार देणाऱ्या लेकीच्या धडपडीचे तोंडभरून कौतुक केले आहे.
पुस्तकातील विशेष आकर्षण
या पुस्तकात देशातील अनेक नामवंत व्यक्तींच्या लेखांचे संकलन आहे. यात प्रामुख्याने:शिवराज पाटील, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, सुशीलकुमार शिंदे.अण्णा हजारे, डॉ. संचेती, विजयबाबू दर्डा, डॉ. माशेलकर, डॉ. हिरानंदानी.तसेच दिवंगत डॉ. देवीसिंह शेखावत यांच्या जुन्या लेखाचाही यात समावेश आहे.
६४ वर्षांचा स्नेहबंध: मधुकर भावे यांनी जागवल्या आठवणी
लेखक मधुकर भावे यांनी १९६२ पासूनचा प्रतिभाताईंसोबतचा प्रवास उलगडला. जळगाव मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून आलेल्या प्रतिभाताईंनी विधानसभेत विचारलेला पहिला प्रश्न आणि तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची त्यावरील प्रतिक्रिया, या आठवणींनी उपस्थितांचे लक्ष वेधले. "६४ वर्षांपासून ताईंनी भावाचे नाते जपले आहे," असे भावे यांनी भावूकपणे नमूद केले.
अद्वितीय राजकीय कारकीर्द
आमदार, मंत्री, खासदार, राजस्थानच्या राज्यपाल ते देशाच्या राष्ट्रपती असा प्रतिभाताईंचा ५० वर्षांचा प्रवास 'पांढऱ्या शुभ्र साडीवर एकही डाग नसलेला' असा राहिला आहे. सुखोई विमानात बसण्याचे धैर्य दाखवणाऱ्या त्या पहिल्या राष्ट्रपती ठरल्या. त्यांच्या या धाडसाची आठवणही या निमित्ताने करून देण्यात आली.या कार्यक्रमातून केवळ एका पुस्तकाचे प्रकाशन झाले नाही, तर नवीन पिढीसाठी मातृभक्ती आणि सार्वजनिक जीवनातील नैतिकतेचा एक आदर्श वस्तुपाठ समोर आला आहे, अशा शब्दांत त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.