अल्पवयीन मुलं-मुलींविरोधातील गुन्ह्यांमध्ये होणारी वाढ हे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेपुढं उभं असणारं एक मोठं आव्हान असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या याच प्रकारचा गुन्हा रायगड जिल्ह्यातील महाड इथं घडल्याचं उघडकीस आलं. जिथं खाजगी शिकवणी चालवणाऱ्या एका शिक्षकाकडून विद्यार्थ्यावर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली.
गुरुशिष्य नात्याला काळीमा फासणारी घटना
रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना उघडकीस आली. गुरुशिष्याच्या पवित्र नात्याला यामुळं काळीमा फासण्यात आल्याचं पाहायला मिळालं. महाडमध्ये एक खाजगी शिकवणी चालवणाऱ्या शिक्षकाने आपल्या विश्वासात असलेल्या अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, सुनील गांधी असं आरोपी शिक्षकाचं नाव असून, तो महाड परिसरात खाजगी शिकवणी वर्ग चालवत होता. परिसरातील अनेक विद्यार्थी त्याच्याकडे शिक्षणासाठी येत होते. पीडित मुलगाही त्याच्याकडे नियमित शिकवणीसाठी जात होता. मात्र, शिक्षकाने विद्यार्थ्याच्या विश्वासार्हतेचा गैरफायदा घेत त्याला शिकवणीच्या निमित्ताने आपल्या घरात नेलं. तिथं त्याला बेडरूममध्ये नेऊन त्याच्याशी अश्लील वर्तन केलं असा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
पीडित मुलाचं खच्चीकरण...
घटनेनंतर पीडित मुलगा मानसिकदृष्ट्या हादरलेला होता. काही काळ तो भीतीपोटी शांत राहिला. मात्र, अखेर त्याने मोठ्या धाडसानं हा प्रकार आपल्या पालकांना सांगितला. मुलानं सांगितलेल्या घटनाक्रमानंतर त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आणि त्यांनी तातडीने महाड पोलीस ठाणे गाठलं, जिथं आरोपीविरोधात तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या आधारे महाड पोलिसांनी आरोपी सुनील गांधी याच्याविरोधात 'पॉक्सो' (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. बालकांवरील लैंगिक अत्याचारांना आळा घालण्यासाठी हा कायदा कठोर मानला जातो आणि दोषी ठरल्यास आरोपीला दीर्घकालीन कारावासाची शिक्षा होऊ शकते.पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत पुढील तपास सुरू केला करत आरोपीचा शोध सुरू आहे. या प्रकरणातील पुरावे गोळा करून न्यायालयीन कारवाईसाठी मजबूत केस तयार करण्यावर पोलिसांचा भर असल्याचं स्पष्ट होत आहे. दरम्यान, या घटनेमुळे महाड परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ज्यामुळं मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.