मिरज उत्पादन शुल्क विभागात ‘अर्थपूर्ण’ शांतता; हातभट्टी जोमात, प्रशासन कोमात! कार्यालयातच ‘२ नंबर’ वाल्यांची उठबस; हुबळी मेड दारूचा मिरजेत महापूर
मिरज :- एकीकडे राज्य शासन अवैध दारूविक्री विरोधात कडक पावले उचलण्याचे दावे करत असताना, मिरज राज्य उत्पादन शुल्क विभागात मात्र उलटी गंगा वाहत असल्याचे चित्र आहे. सध्या या विभागात अतिशय गंभीर बाबी चव्हाट्यावर आल्या असून, 'झिरो'ची चलती आणि अवैध धंदेवाईकांशी असणारे साटंलोटं यामुळे प्रशासनाची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.
हातभट्टी जोमात, अधिकारी कोमात?
मिरज शहर आणि परिसरात सध्या हातभट्टीच्या दारूने उच्छाद मांडला आहे. गावागावात ही विषारी दारू पोहोचत असताना राज्य उत्पादन शुल्क विभाग मात्र सुस्त आहे. या विभागाचे नेमके कोणावर नियंत्रण आहे, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, कर्नाटक सीमेवरून येणारी ‘हुबळी मेड’ दारू कोणतीही भीती न बाळगता मिरजेत बिनबोभाटा पुरवली जात आहे. या तस्करीकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली जात असल्याची चर्चा सध्या रंगली आहे.
कार्यालयातच धंदेवाईकांचा डेरा!
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, ज्या कार्यालयातून अवैध धंद्यांचा बिमोड होणे अपेक्षित आहे, त्याच कार्यालयात चक्क अवैध धंदे करणाऱ्यांची उठबस वाढली आहे. संबंधित विभागाचे ‘साहेब’ आणि या २ नंबरच्या धंद्यातील किंगपिन यांच्यात ‘अर्थपूर्ण’ व्यवहार होत असल्याची जोरदार चर्चा आहे. कार्यालयातच बसून या व्यवहारांचे नियोजन होत असल्याने आता कुंपणच शेत खात असल्याचे स्पष्ट होत आहे.
:- उद्या दुसरा भाग
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.