Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'शिंदे गटात जाऊ नका', समर्थकाच्या विनंतीवर संजय जाधव म्हणाले, "उद्याचं कोणी पाहिलंय?"

'शिंदे गटात जाऊ नका', समर्थकाच्या विनंतीवर संजय जाधव म्हणाले, "उद्याचं कोणी पाहिलंय?"


उद्धव ठाकरेंच्या खासदारांची एकनाथ शिंदेंसोबत बैठक झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे, 9 पैकी 6 खासदारांची ठाण्यात शिंदेंसोबत एका ठिकाणी बैठक झाली अशा चर्चांना तोंड फुटलं आहे. तर दोन खासदार व्हिडिओ कॉलद्वारे उपस्थित असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यादरम्यान उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे खासदार संजय जाधव यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये त्यांचा समर्थक त्यांना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाऊ नका असं आवाहन करत आहे. यावेळी संजय जाधव यांनी दिलेल्या उत्तराने मात्र भुवया उंचावल्या आहेत. उद्याचं कोणी पाहिलं आहे. वेळ बदलत असते असं सूचक उत्तर त्यांनी दिलं. यामुळे संजय जाधव शिवसेनेत जाणार अशी चर्चा रंगली आहे.

ऑडिओ क्लिपमधील संवाद असा आहे -

समर्थक - खासदार साहेब बोलत आहेत का?
संजय जाधव - बोलतोय
समर्थक - तुम्ही शिंदे गटात जात आहात अशी चर्चा सुरु आहे
संजय जाधव -नाही बाबा, कोणी काहीही बोलतंय
समर्थक - मुस्लिमांनी तुम्हा जबाबदारीने आणि इमानदारीने मत दिलं आहे.
संजय जाधव - हो दिले ना
समर्थक - तुम्ही गेलात तर आम्हाला त्रास होईल. तुमचा सख्खा भाऊ तुमच्यासोबत नव्हता. तुम्हाला विरोध करत होता, वाईट बोलत होता. तुम्ही शिंदे गटात गेलात तर नाराजी वाढेल. आम्ही कधीच हिंदू नेतृत्वावर विश्वास ठेवू शकणार नाही. मग आम्हीही जाहीरपणे भाजपासोबत राहू,
संजय जाधव -उद्या काय होणार हे कोणी पाहिलं आहे
समर्थक - तुम्हाला सेक्यूलर समजून आम्ही मतं दिली. तुम्ही शिंदे गटात गेलात तर ते भाजपासोबत आहेत. मुस्लिमांची भाजपासोबत दुश्मनी वाढत आहे. मग आम्ही जाहीरपणे भाजपासोबत राहण्यात काय वाईट आहे.
संजय जाधव -जेव्हा होईल तेव्हा पाहू
समर्थक - आम्ही तुमच्यासाठी जीव, पैसा, सन्मान सगळं काही लावलं, त्यामुळे त्रास होत आहे. तीन चार दिवासंपासून तुमच्या नावाची तर्चा आहे. ऑपरेशन टायगरमध्ये तुमचं नाव आल्याने त्रास झाला म्हणूनच फोन लावला
संजय जाधव - टायगर फेल मीच केला माहिती आहे ना
समर्थक - तुमच्यावर विश्वास आहे, पण मालच्या नादात सगळं होतं.
संजय जाधव - माल घ्यायचा असता 2022 मध्ये घेतला असता. तेव्हा भरपूर मिळत होता

नेमकं काय घडलंय?
राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूंकप होणार अशी चर्चा सुरू आहे, ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांची एकनाथ शिंदेंसोबत बुधवारी बैठक झाल्याच्या चर्चेनं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे, उद्धव ठाकरेंच्या नऊपैकी आठ खासदारांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे, दरम्यान या बैठकीत उद्धव ठाकरेंच्या खासदारांनी पक्षांतर करण्याचं आश्वासन दिल्याचीही चर्चा आहे.
शिवसेनेच्या खासदारांकडून स्पष्टीकरण

राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या या चर्चांनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मला उभा चिरला तरी मातोश्री आणि उद्धव ठाकरेंशी प्रतारणा करणार नसल्याचं खासदार अरविंद सावंतांनी म्हटलं आहे, तर एकनाथ शिंदे योग्यवेळ पाहून ऑपरेशन टायगर करतील असं म्हणत संजय शिरसाटांनी ऑपरेशन टायगरच्या चर्चांना दुजोरा दिला आहे.

दावे-प्रतिदावे
उद्धव ठाकरेंचे खासदार फुटणार या चर्चांवर संजय राऊतांनीही स्पष्टोक्ती दिली आहे. ऑपरेशन टायगरवरून संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंच्याच पक्षावर टीकास्त्र डागलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच शिंदेंच्या पक्षाचं ऑपरेशन करत असल्याचा दावा राऊतांकडून करण्यात आला आहे, तर राऊतांच्या पक्षाची डेड बॉडी झाल्याचा पलटवार नवनाथ बन यांनी केला आहे.
'शिंदेंसोबत कोणतीही बैठक किंवा चर्चा झालेली नाही'

मागील अनेक दिवसांपासून शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा आहे, याआधीही अनेकदा ठाकरेंचे खासदार संपर्कात असल्याची चर्चा होती मात्र, आता शिंदेंसोबत ठाकरेंच्या खासदारांची बैठक झाल्याच्या चर्चांना उधाण आलंय, मात्र शिंदेंसोबत कोणतीही बैठक किंवा चर्चा झालेली नाही. असं स्पष्टीकरण ठाकरेंच्या खासदारांकडून देण्यात आलं आहे.

एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण
राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या या चर्चांवर एकनाथ शिंदेंनी देखील स्पष्टीकरण दिलं आहे. ठाकरेंच्या खासदारांसोबत कोणतीही चर्चा झालेली नाही. बैठकीची चर्चा केवळ अफवा आहे अशी एकनाथ शिंदेंनी झी 24 तासला माहिती दिली आहे. एकीकडे एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या खासदारांसोबत बैठक झाली नसल्याचं म्हटलं आहे. मात्र दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे मंत्री या चर्चांना दुजोरा देताना दिसत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.