​हादरवून टाकणारी घटना! बहिणीचा सांगाडा खांद्यावर घेऊन भाऊ पोहोचला बँकेत; ओडिसामधील 'त्या' प्रकरणाने संपूर्ण देश सुन्न


केओंजहार (ओडिसा): प्रशासकीय दिरंगाई आणि बँक कर्मचाऱ्यांच्या असंवेदनशीलतेचा एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार ओडिसामध्ये समोर आला आहे. आपल्या हक्काचे पैसे मिळवण्यासाठी एका हतबल भावाला आपल्या मृत बहिणीची कबर खोदून, तिचा हाडांचा सांगाडा पोत्यात भरून बँकेत नेण्याची वेळ आली. ही हृदयद्रावक घटना ओडिसाच्या केओंजहार जिल्ह्यातील पटना ब्लॉकमध्ये घडली असून, यामुळे संतापाची लाट उसळली आहे.

​नेमकं प्रकरण काय?

​दिआनाली गावचे रहिवासी असलेले ५० वर्षीय जितू मुंडा यांची मोठी बहीण कालरा मुंडा यांचे दोन महिन्यांपूर्वी आजारपणाने निधन झाले. कालरा यांनी जनावरे विकून कष्टाने कमावलेले २० हजार रुपये ओडिसा ग्रामीण बँकेच्या मालीपोसी शाखेत जमा होते. कालरा यांना दुसरे कोणीही वारसदार नसल्याने, जितू मुंडा हेच त्या पैशांचे एकमेव हक्कदार होते.

​"तिला घेऊन या, तरच पैसे मिळतील!"
​जितू मुंडा यांनी पैसे काढण्यासाठी बँकेचे अनेक उंबरठे झिजवले. मात्र, अशिक्षित असल्याने त्यांच्याकडे मृत्यूचा दाखला किंवा इतर कायदेशीर कागदपत्रे नव्हती. जितू मुंडा यांच्या दाव्यानुसार: ​"मी वारंवार बँकेत गेलो, पण तिथले अधिकारी ऐकायला तयार नव्हते. 'ज्यांच्या नावावर खाते आहे त्यांना समोर घेऊन या, तरच पैसे मिळतील', असे त्यांनी मला ठणकावून सांगितले. मी ओरडून सांगत होतो की तिचा मृत्यू झाला आहे, पण त्यांनी माझे ऐकले नाही. अखेर नाईलाजास्तव मी तिची कबर खोदली आणि तिचा सांगाडा पुराव्यासाठी बँकेत घेऊन आलो."

​यंत्रणेचे अपयश आणि पोलिसांची मध्यस्थी

​एका आदिवासी व्यक्तीला अशा प्रकारे हाडांचा सांगाडा घेऊन बँकेत आलेले पाहून परिसरात खळबळ उडाली. माहिती मिळताच पटना पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर किरण प्रसाद साहू तिथे पोहोचले. त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून बँक प्रशासनाला जाब विचारला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितू मुंडा हे अशिक्षित असल्याने त्यांना 'नॉमिनी' किंवा कायदेशीर वारसदार प्रक्रियेची माहिती नव्हती आणि बँक अधिकारी त्यांना ही प्रक्रिया समजावून सांगण्यात पूर्णपणे अपयशी ठरले.

​आता हालचालींना वेग
​या घटनेनंतर आता कुठे प्रशासनाचे डोळे उघडले आहेत. स्थानिक गट विकास अधिकारी (BDO) आणि बँक अधिकाऱ्यांनी आता तातडीने पैसे मिळवून देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पोलिसांनी जितू यांना आश्वासन दिल्यानंतर, त्यांच्या बहिणीच्या सांगाड्यावर पुन्हा अंत्यसंस्कार करण्यात आले. बँकिंग व्यवस्थेतील हा 'दगडी' कारभार एका गरिबाच्या भावनांशी किती क्रूरपणे खेळू शकतो, याचे हे जिवंत आणि भयावह उदाहरण ठरले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.