सध्या घरगुती गॅस मिळवताना सामान्यांची दमछाक होत असतानाच, याचा गैरफायदा घेत घरगुती सिलिंडरमधील गॅस व्यावसायिक सिलिंडरमध्ये ट्रान्स्फर करून विकणार्या एकाला काळेपडळ पोलिसांनी अटक केली. हांडेवाडीत टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी १०३ गॅस सिलिंडर जप्त केले आहेत. आरोपी सिलिंडर तब्बल ३ ते ५ हजारांना विकत होता. नितीन हनुमंत होळकर (वय ३८, रा. हांडेवाडी) याला अटक केली आहे.
जागतिक युद्धजन्य स्थितीमुळे सध्या गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. सामान्यांना गॅस मिळणे अवघड झाले आहे. याचा फायदा घेत होळकर घरगुती सिलिंडर साठवून ठेवायचा आणि गॅस संपलेल्या गरजू ग्राहकांना ते ३ ते ५ हजार रुपयांना काळ्या बाजारात विकायचा. ग्राहकाची गरज किती तातडीची आहे, यानुसार तो किंमत वाढवायचा. काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील यांचे पथक गस्तीवर असताना पोलीस अंमलदार महादेव शिंदे यांना याची माहिती मिळाली.
पोलिसांनी सापळा रचून धाड टाकली. यावेळी वेगवेगळ्या कंपन्यांचे १०३ सिलिंडर, गॅस ट्रान्स्फर करण्यासाठी लागणारे साहित्य असा ९० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीकडे गॅस साठवण्याची किंवा विक्रीसाठी कोणताही अधिकृत परवाना नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात गॅस सिलिंडर आरोपीकडे कोठून आले, यामध्ये एखाद्या गॅस एजन्सीचे किंवा वितरकाचे संगनमत आहे का? याचा सखोल तपास पोलीस करत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.