चंद्रपूर : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरलेला असतानाच, चंद्रपूर जिल्ह्यातही अघोरी पूजेचा प्रकार उघडकीस आला आहे. मागील दोन वर्षांपासून गुप्तधनाच्या आमिषाने कुमारिका आणि विधवा महिलांचा अघोरी पूजेसाठी वापर केला जात असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात महिलांचे मोठ्या प्रमाणावर लैंगिक शोषण झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सावली तालुक्यातील चिंचडोह बॅरेज परिसरात कासवांची तस्करी पकडल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघड झाला. सावली वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी १२ एप्रिल रोजी तीन दुचाकींवरून दोन जिवंत कासवांची तस्करी करणाऱ्या सहा जणांना अटक केली. गंगाधर बुरांडे, मोरेश्वर देवतळे, ओम शिंदे, हेमचंद शेंडे, धवल वेलादी आणि राजेंद्र दिवसे अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींचे मोबाईल तपासले असता वनअधिकाऱ्यांना जबर धक्का बसला.या मोबाइलमध्ये वन्यजीव तस्करीसोबतच अघोरी पूजेचे अत्यंत किळसवाणे व्हिडिओ आणि चॅटिंग आढळले. स्मशानभूमीत मध्यरात्री केलेल्या अघोरी पूजेचे व्हिडिओ चित्रीकरण, घुबड आणि कासवांचे फोटो, तसेच अनेक तरुण मुली आणि विधवा महिलांचे फोटो, त्यांच्या जन्मकुंडल्या आणि इतकेच नव्हे तर त्यांच्या खासगी अवयवांचे फोटोही हाती लागले आहेत. काही महिलांच्या मासिक पाळीच्या तारखांची नोंदही आरोपींनी ठेवली होती. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.आरोपींनी अघोरी पूजेतून सोन्याची बिस्किटे मिळाल्याचा बनाव रचला होता; मात्र ती बिस्किटे बनावट असल्याचे उघड झाले. सध्या सर्व सहा आरोपी वनकोठडीत असून, मुख्य सूत्रधार असलेला मांत्रिक आणि महाराज अद्याप फरार आहेत. हे प्रकरण अत्यंत गंभीर आणि गुन्हेगारी स्वरूपाचे असल्याने लवकरच हा तपास पोलिस विभागाकडे वर्ग केला जाणार आहे.
या प्रकरणामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, भोंदूगिरीच्या या विळख्यात अजून किती महिला अडकल्या आहेत, याची धक्कादायक माहिती तपासाअंती समोर येण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील मांत्रिकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. या टोळीचे जाळे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील चिमूर, पोंभुर्णा आणि चामोर्शी या ग्रामीण भागांत पसरलेले आहे. दरम्यान या प्रकरणात गुरुवारी (ता. १६) आणखी दहा जणांना ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नव्हता.
असे चालायचे रॅकेट
या रॅकेटमध्ये जवळपास ५० मध्यस्थ असून ते 'शिकार' शोधायचे. 'शिकार' महिलांच्या जन्मकुंडल्या आणि त्यांचे व्हिडिओ मध्यस्थ मुख्य मांत्रिकाकडे पाठवायचा. या वर्तुळात मांत्रिकाला 'टेस्टर' म्हटले जात होते. एखादी महिला किंवा प्राणी अघोरी पूजेसाठी 'योग्य' आहे की नाही, हे हा टेस्टर ठरवायचा. त्यानंतर निर्जन स्थळी किंवा स्मशानभूमीत रात्री अघोरी विधी पार पाडला जायचा. पैशाचा पाऊस पाडणे आणि गुप्तधन मिळवून देण्याच्या नावाखाली लोकांना फसवले जायचे.यासंदर्भात बोलताना, कासव तस्करीतील आरोपींच्या मोबाइलमध्ये अघोरी पूजेचे व्हिडिओ मिळाले. हे प्रकरण गंभीर आहे. या पूजेत मुली आणि विधवा महिलांचा वापर केला जात होता, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांनी दिली. याशिवाय घुबड आणि कासव यांचा संबंध आपल्या पुराणांमध्ये धनसंपत्तीशी जोडला जातो. त्यामुळे अघोरी पूजेत त्यांचा वापर केला जातो. विधवा महिला आणि कुमारिका या मांत्रिकांचे सहज सावज ठरतात व त्यांचे शोषणही पूजेच्या निमित्ताने केले जाते, अशी प्रतिक्रिया अंनिसचे हरिभाऊ पाथोडे यांनी दिली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.