मालेगाव : शाळांमधील विद्यार्थी संख्या फुगवून दाखवणे किंवा पटसंख्येच्या तुलनेत वर्गात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांची अनुपस्थिती असणे, अशा तक्रारी नवीन नाहीत. त्यामुळेच शासनाकडून राज्यात एकाच वेळी शाळांमधील पट पडताळणी सध्या सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर खुद्द शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी काही दिवसांपूर्वी एका शाळेला अचानक दिलेल्या भेटीप्रसंगी काय चित्र पाहिले, याची माहिती गुरुवारी येथे आयोजित एका बैठकीत उघड केली. ही माहिती ऐकल्यावर उपस्थित सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
मालेगावातील शिक्षण व आरोग्य विभागाचा आढावा घेण्यासाठी भुसे यांनी महापालिकेत बैठक आयोजित केली होती. काही दिवसांपूर्वी मालेगाव कॅम्पातील महापालिकेच्या एका मराठी शाळेला त्यांनी अचानक भेट दिली होती. या भेटीदरम्यान शाळेची पटसंख्या २९२ असताना प्रत्यक्ष उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या जेमतेम २५ असल्याचे आढळून आले.
तसेच ११ पैकी तेथे केवळ ३ शिक्षक उपस्थित असल्याचे निदर्शनास आले होते, अशी धक्कादायक माहिती भुसे यांनी बैठकीत दिली. एका वर्गात दोन-पाच विद्यार्थी गैरहजर राहिले तर ते समजू शकते; मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी शाळेत अनुपस्थित असणे ही बाब अत्यंत गंभीर व चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले. या स्थितीत तातडीने सुधारणा करण्याच्या सूचना त्यांनी शिक्षण मंडळ प्रशासनाला दिल्या.
बैठकीला आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल, महापौर नसरीन बानो शेख,प्रभारी आयुक्त रोहिदास दोरकुळकर, उपमहापौर शान-ए-हिंद, स्थायी समिती सभापती एजाज बेग,उपायुक्त हेमलता डगळे, डॉ.सुनिता कुमावत, पल्लवी शिरसाठ,आरोग्याधिकारी डॉ. जितेंद्र डोलारे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी गजानन पाटील, प्रशासन अधिकारी तानाजी घोंगडे, नगरसेवक नीलेश आहेर, नरेंद्र सोनवणे, मुस्तकीम डिग्निटी,दिनेश ठाकरे यांच्यासह महापालिकेतील अन्य नगरसेवक,अधिकारी-कर्मचारी व शिक्षक उपस्थित होते.
शिष्यवृत्ती परीक्षेचे वावडे आहे का?
या बैठकीत महापालिका शिक्षण मंडळातर्फे शैक्षणिक सादरीकरण करण्यात आले. यात महापालिकेच्या ७९ उर्दू व दोन मराठी प्राथमिक शाळा असल्याची माहिती देण्यात आली. या सर्व शाळांची एकूण विद्यार्थी संख्या १७ हजारांवर आहे. या शाळांमधील चौथी व सातवीच्या वर्गातील शिष्यवृत्तीच्या परीक्षेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अनुक्रमे १७१ व ८० असल्याची माहिती देण्यात आली. शाळांच्या मानाने शिष्यवृत्तीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या फारच कमी असल्याने मंत्री भुसे यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली.बैठकीला उपस्थित असलेल्या काही नगरसेवकांनी विद्यार्थ्यांना पोषण आहारात रोज केवळ तांदळाची खिचडी दिली जाते, अशी तक्रार केली. त्यावर ‘मेनू’प्रमाणे विद्यार्थ्यांना दर्जेदार अन्न दिले जावे, यासाठी प्रशासनाने लक्ष घालावे,असे आदेश भुसे यांनी दिले. तसेच काही शिक्षक स्वतः वर्गात जाण्याऐवजी अनाधिकृतपणे ‘बदली शिक्षका’ला शाळेत पाठवतात, हा मुद्दा काही नगरसेवकांनी मांडला. त्यावरही मंत्री भुसे संतापले. असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही, जर यापुढे एखाद्या शाळेत ‘बदली शिक्षक’ आढळून आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
शिक्षण व आरोग्याला प्राधान्यक्रम
यावेळी बोलताना भुसे यांनी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व आनंददायी शिक्षण देण्यावर भर दिला. शाळांना चांगल्या इमारती, संरक्षण भिंत, स्वच्छतागृह, पिण्याचे शुद्ध पाणी आदी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न असून या अनुषंगाने शहरातील शाळांसाठी करावयाच्या कामांचा आराखडा तयार करण्याच्या सूचना भुसे यांनी दिल्या. शिक्षणाबरोबरच आरोग्य हा देखील महत्त्वाचा विषय आहे. त्या अनुषंगाने शहरातील रुग्णालयांद्वारे चांगली वैद्यकीय सेवा द्यावी, वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी सूचना भुसे यांनी बैठकीत केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.