Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अभिनेता विजयचा मोठा राजकीय धमाका; महिलांना दरमहा २५०० रुपये आणि लग्नासाठी सोनं!

अभिनेता विजयचा मोठा राजकीय धमाका; महिलांना दरमहा २५०० रुपये आणि लग्नासाठी सोनं!


तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिनेता विजय यांच्या 'तमिळगा वेट्टी कड़गम' (TVK) पक्षाने आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. निवडणुकीत पहिल्यांदाच आपले नशीब आजमावात असलेल्या विजय यांनी आपल्या जाहीरनाम्यात महिला आणि तरुणांसाठी जबरदस्त घोषणा केल्या आहेत. मोफत गॅस सिलिंडरपासून ते लग्नासाठी सोन्यापर्यंत आणि पदविधर तरुणांना अर्थसहाय्यापर्यंत मोठ मोठी आश्वासने देण्यात आली आहेत.

महिला वर्ग केंद्र स्थानी -

विजय यांनी आपल्या जाहीरनाम्यात महिला वर्गाला केंद्र स्थानी ठेवले आहे. ६० वर्षांखालील महिलांना दरमहा २,५०० रुपयांची मदत, प्रत्येक कुटुंबाला वर्षाला ६ मोफत गॅस सिलिंडर आणि गरीब कुटुंबातील महिलांना लग्नासाठी ८ ग्रॅम सोने तसेच उच्च दर्जाची सिल्क साडी देण्याचे आश्वासन या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, पक्षाने २३४ जागांपैकी २४ जागांवर महिला उमेदवारांना तिकीट देऊन त्यांना राजकारणातही संधी दिली आहे.

तरुणांसाठीही मोठ्या घोषणा -
तरुणांना आकर्षित करण्यासाठी या जाहीरनाम्यात, पदवीधरांना दरमहा ४००० रुपये आणि डिप्लोमा धारकांना २००० रुपये भत्ता देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे, खासगी उद्योगांमध्ये तमिळ लोकांसाठी ७५ टक्के नोकऱ्या राखीव ठेवण्याचे आणि तरुणांना व्याजमुक्त स्टार्टअप कर्ज देण्याचे आश्वासनही विजय यांनी आपल्या पक्षाच्या जाहीरनाम्यात दिले आहे.

महत्वाचे म्हणजे, विजय यांचा TVK पक्ष कोणत्याही मोठ्या आघाडीचा भाग न होता सर्व २३४ जागांवर स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहे. विजय स्वतः पेरम्बूर आणि त्रिची ईस्ट या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. तमिळनाडूमध्ये २३ एप्रिल २०२६ रोजी मतदान होणार असून, ४ मे रोजी निकाल जाहीर होणार आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.