Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मोठा निर्णय! शाळांची घंटा वाजण्यापूर्वी १३ हजार शिक्षकांची मेगाभरती; ९००० माध्यमिक तर ४००० जागा जिल्हा परिषदेच्या!

मोठा निर्णय! शाळांची घंटा वाजण्यापूर्वी १३ हजार शिक्षकांची मेगाभरती; ९००० माध्यमिक तर ४००० जागा जिल्हा परिषदेच्या!


राज्यातील १७ हजार माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांची १५ हजार पदे रिक्त आहेत. आता संचमान्यतेत अतिरिक्त ठरलेल्या सुमारे सहा हजार शिक्षकांचे ३० एप्रिलपूर्वी समायोजन होणार आहे. त्यानंतर शैक्षणिक संस्थांची बिंदुनामावली अंतिम करुन मे महिन्यात एकाचवेळी पवित्र पोर्टलवर जाहिराती प्रसिद्ध होतील. माध्यमिक शाळांमधील नऊ हजार तर जिल्हा परिषद शाळांमधील सुमारे चार हजार, अशी १३ हजार शिक्षकांची पदे भरली जातील, अशी माहिती शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

सध्या खासगी अनुदानित माध्यमिक शाळांमध्ये सुमारे १५ हजार, स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी अनुदानित प्राथमिक शाळांमध्ये दहा हजारांपर्यंत पदे रिक्त आहेत. १ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार झालेल्या संचमान्यतेत पटसंख्येच्या निकषांनुसार अतिरिक्त ठरलेल्या सुमारे १२ ते १३ हजार शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे दुसऱ्या शाळांमध्ये समायोजन सुरु आहे. दुसरीकडे तांत्रिक पडताळणी करुन पवित्र पोर्टलही शिक्षक भरतीसाठी तयार ठेवले आहे. त्यावर एक लाख ७० हजार उमेदवारांची नोंदणी देखील झाली आहे.

आता समायोजन झाल्यावर बिंदुनामावली अंतिम होईल. मे महिन्यात रिक्त पदांच्या जाहिराती मागवून उमेदवारांना प्राधान्यक्रम (सरकारी शाळांमधील भरतीसाठी १०० शाळा आणि खासगी अनुदानित शाळांमधील भरतीसाठी ५० शाळांचा पसंतीक्रम भरावा लागेल) भरायची संधी मिळेल. त्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध होऊन एका पदासाठी तीन उमेदवार खासगी संस्थांमध्ये मुलाखतीसाठी पाठविले जातील. तर गुणवत्ता यादीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदे थेट भरली जातील.
शिक्षकांना 'टीईटी'चे बंधन कायम

सर्वोच्च न्यायालयाने १ सप्टेंबर २०२४ रोजी इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांवरील सर्वच शिक्षकांनी (सेवानिवृत्तीला पाच वर्षे शिल्लक असलेले वगळून) दोन वर्षांत 'टीईटी' उत्तीर्ण व्हावी, अन्यथा सक्तीच्या सेवानिवृत्तीची कारवाई करण्यात येईल, असा आदेश दिला. मात्र, संसदेत नव्याने मंजूर झालेल्या विधेयकातून शिक्षकांना दिलासा मिळाल्याची खबर मिळाल्याने सगळेच आनंदात आहेत. परंतु, त्यासंदर्भातील कोणतेही आदेश, पत्र शालेय शिक्षण विभागापर्यंत पोचलेले नाहीत. त्यामुळे २१ जून रोजी होणाऱ्या 'टीईटी'साठी सर्व शिक्षकांनी १६ एप्रिलपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन शिक्षणाधिकाऱ्यांनी केले आहे.

समायोजनानंतर ठरेल रिक्त पदांची आकडेवारी

माध्यमिक शाळांमधील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पुढील २० दिवसांत समायोजन होईल. त्यानंतर रिक्त पदांची बिंदुनामावली अंतिम होऊन पवित्र पोर्टलवर जाहिराती प्रसिद्ध होतील. माध्यमिक शाळांमधील साधारणत: आठ ते नऊ हजार पदांची भरती होऊ शकते, पण अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनानंतर ती संख्या निश्चित होईल.

- डॉ. श्रीराम पानझडे, सहसंचालक, माध्यमिक शिक्षण, पुणे
शिक्षक भरतीची संभाव्य स्थिती
अनुदानित माध्यमिक शाळा
१७,१५७
भरतीतील अंदाजे पदे
९,०००
झेडपीसह अन्य शाळा
७०,०००
शिक्षकांची पदभरती
४,०००
एकूण शिक्षक भरती
१३,०००

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.