Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​"ते रक्ताचे नातू, मी विचारांचा नातू; आम्ही सर्व एकत्रच!" – रामदास आठवले

​"ते रक्ताचे नातू, मी विचारांचा नातू; आम्ही सर्व एकत्रच!" – रामदास आठवले


पिंपरी : भीमराव यशवंतराव आंबेडकर हे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत. मी देखील बाबासाहेबांच्या विचारांचा नातू आहे. बाबासाहेबांच्या कुटुंबाप्रति आम्हाला आदर आहे. कुठेही असलो तरी आम्ही सगळे एकत्र आहोत. चळवळीसाठी आम्ही एकत्र येतो. स्मारकाच्या उद्घाटनासाठी पुन्हा एकत्र येऊ, असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला. पिंपरी येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारकालगत माता रमाई यांच्या स्मारकाच्या कोनशिलेचे अनावरण मंगळवारी (दि. २८ एप्रिल) करण्यात आले. त्यावेळी मंत्री आठवले बोलत होते. भीमराव यशवंतराव आंबेडकर, महापौर रवी लांडगे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप उपस्थित होते.
रामदास आठवले म्हणाले, ''बाबासाहेबांनी सांगितले आहे की, आपण सत्तेमध्ये आलो पाहिजे. त्यामुळे आम्ही सत्तेत आहोत. पिंपरी-चिंचवड महापालिकेत आमचे दोन नगरसेवक निवडून आले आहेत. महापालिकेतर्फे २३ कोटी रुपये खर्च करून दोन वर्षांमध्ये स्मारक उभे राहणार आहे. स्मारकाबाबत २०१७ मध्ये प्रस्ताव ठेवला होता. आता ८-९ वर्षांनंतर का असेना पण त्याला मान्यता मिळालेली आहे. महापालिकेने स्मारकाच्या उद्घाटनाला भीमराव आणि प्रकाश आंबेडकर यांच्यासह मलाही बोलवावे. आम्ही येऊ.''
''पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता येईल''

पत्रकारांशी बोलताना रामदास आठवले म्हणाले, ''पश्चिम बंगाल आणि इतर पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये, पाचपैकी किमान चार राज्यांमध्ये एनडीएची सत्ता येण्याची शक्यता आहे. आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये आमची सत्ता आहेच. आता पश्चिम बंगालमध्येही आमची सत्ता निश्चितपणे येईल आणि भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल, असा विश्वास आहे. ममता दीदींनी काम केले असले तरी तिथे गुंडागर्दी आणि राजकीय गुन्हेगारी वाढली आहे, ज्यामुळे बंगालच्या जनतेचे नुकसान झाले आहे. त्यामुळे लोक आता नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना पसंती देत आहेत. तामिळनाडूमध्येही महिला आरक्षणाविरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे महिला आमच्या बाजूने मतदान करतील आणि त्याचा फायदा आम्हाला होईल.

''सुनेत्रा पवार निवडून येतील''
बारामतीमध्ये ५८ टक्के मतदान झालेले आहे. तेथे मोठ्या मताधिक्क्याने सुनेत्रा पवार निवडून येतील. अजितदादांना खरी श्रद्धांजली अर्पण करायची असेल, तर सुनेत्रा पवारांना प्रचंड मतांनी निवडून आणणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रचार केलेला आहे. त्या नक्कीच निवडून येतील, असा विश्वासही रामदास आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.