Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली दर्पण विशेष! अधीक्षकांना अंधारात ठेवून राज्य उत्पादन शुल्कात 'प्रवीण अण्णा'चा समांतर कारभार; ACB आता कोणाची गचांडी धरणार?

सांगली दर्पण विशेष! अधीक्षकांना अंधारात ठेवून राज्य उत्पादन शुल्कात 'प्रवीण अण्णा'चा समांतर कारभार; ACB आता कोणाची गचांडी धरणार?


सांगली दर्पण विशेष! ​सांगली जिल्ह्यात सध्या एका नावाच्या चर्चेने प्रशासकीय वर्तुळात आणि विशेषतः राज्य उत्पादन शुल्क विभागात मोठी खळबळ उडवून दिली आहे, ते नाव म्हणजे 'प्रवीण अण्णा'. धक्कादायक बाब म्हणजे, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांना पूर्णपणे अंधारात ठेवून प्रवीण अण्णाने अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मदतीने परमिट रूम आणि बिअर शॉपीच्या प्रस्तावांचा जो खेळ मांडला आहे, तो आता त्याच्याच अंगलट येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

​अधीक्षकांच्या डोळ्यांत धूळफेक!

मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, प्रवीण अण्णाने आजवर जेवढे परमिट रूम आणि बिअर शॉपीचे प्रस्ताव तयार केले, त्यामध्ये नियमांची सर्रास पायमल्ली करण्यात आली आहे. अत्यंत संतापजनक बाब म्हणजे, या विभागाच्या मुख्य अधीक्षकांना या प्रकरणाची पुसटशी कल्पनाही लागू न देता, खालच्या स्तरावरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अण्णाशी 'अर्थपूर्ण' हातमिळवणी केली. अधीक्षकांचा विश्वासघात करून राबवलेले हे 'भ्रष्ट नेक्सस' आता तपासाच्या जाळ्यात अडकले आहे.

ACB आणि आयकर विभाग 'ॲक्शन मोड'मध्ये
या संपूर्ण प्रकरणाची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत, याची शहनिशा करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) आता सक्रिय झाला आहे. प्रत्येक फाईलची तांत्रिक तपासणी सुरू झाली असून, अधीक्षकांना अंधारात ठेवून कोणत्या टेबलावरून या फाईल्स पुढे सरकल्या, याचा कच्चा चिट्ठा 'एसीबी'ने तयार केला आहे. सोबतच, या प्रस्तावांच्या आड झालेली कोट्यवधींची उलाढाल पाहून आयकर विभागही (Income Tax) समांतर चौकशीच्या तयारीत आहे.
​अधिकारी-कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले

प्रवीण अण्णासोबत मिळून ज्या अधिकाऱ्यांनी स्वतःची घरं भरली आणि खात्याची प्रतिमा मलिन केली, त्यांची आता झोप उडाली आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर सूत्रांनी 'सांगली दर्पण'ला सांगितले की, या प्रकरणात लवकरच एका मोठ्या खात्यांतर्गत चौकशीचा 'ससेमीरा' लागणार आहे. अधीक्षकांची दिशाभूल करणाऱ्या या भ्रष्ट टोळीची गचांडी धरली जाणार हे आता निश्चित मानले जात आहे.

मोठे मासे गळाला लागणार!
प्रस्तावातील त्रुटींकडे डोळेझाक करण्यासाठी प्रवीण अण्णाने कोणत्या अधिकाऱ्यांच्या खिशात 'लक्ष्मी' दर्शन घडवले, याचा हिशोब आता तपास यंत्रणा घेणार आहेत. या रॅकेटमध्ये विभागातील काही 'विभीषण' सामील असून, लवकरच मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यातील या मोठ्या भ्रष्टाचाराच्या रॅकेटचा आणि अधीक्षकांच्या नकळत चालणाऱ्या या काळया कारभाराचा पर्दाफाश 'सांगली दर्पण' सातत्याने करत राहणार आहे.
क्रमश...




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.