सांगलीत लाचखोर दाम्पत्य एसीबीच्या जाळ्यात; ५० हजारांच्या व्यवहारापोटी ३५ हजार स्वीकारताना सरपंच पत्नी अन् शिक्षक पती जेरबंद!
सांगली : सरपंच पत्नीच्या सोबतीने लाच घेणाऱ्या प्राथमिक शिक्षकाच्या निलंबनाचा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. लवकरच तसे आदेश निघतील, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी आज दिली. दरम्यान, लाच स्वीकारणाऱ्या सरपंच शीतल पाटील यांच्यावरही कारवाईची टांगती तलवार असल्याचे स्पष्ट आहे.
बाळासाहेब आकाराम पाटील (रा. वाकुर्डे खुर्द, ता. शिराळा) असे शिक्षकाचे नाव आहे. सोमवारी (ता. ६) सायंकाळी पत्नी शीतल यांच्यासह त्याला ३५ हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले होते. पेव्हिंग ब्लॉकच्या कामाचे ग्रामपंचायतीकडे हस्तांतरण करून घेण्यासाठी व शासकीय कपाती परत करण्यासाठी त्यांनी ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती ३५ हजार रुपयांवर व्यवहार ठरला.शिराळा तहसील कार्यालयासमोरील एका हाटेलच्या पोर्चमध्ये लाच स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्याविरोधात शिराळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यांना अटक करण्यात आली. या कारवाईची माहिती शिराळा गटविकास अधिकाऱ्यांनी व गटशिक्षणाधिकारी यांना जिल्हा परिषदेला दिली आहे. बाळासाहेब पाटील हा जाधववाडी (माधळगाव) येथे प्राथमिक शाळेत शिक्षक आहे.
प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी सांगितले की, पाटील याच्यावरील कारवाईचा अहवाल मागवला आहे. त्याला ४८ तासांची पोलिस कोठडी झाली असल्यास त्याच्या निलंबनाचा प्रस्ताव तयार करुन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठवला जाईल. त्यानंतर त्यांच्याकडून निलंबनाचे आदेश जारी होतील. दरम्यान, लाच स्वीकारणाऱ्या सरपंच शीतल पाटील यांच्यावर कोणती कारवाई होणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.