Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"सांगली महापालिकेत भाजपमध्ये राडा! महापौर आणि सभापतींमध्ये वादाची ठिणगी"

"सांगली महापालिकेत भाजपमध्ये राडा! महापौर आणि सभापतींमध्ये वादाची ठिणगी"


सांगली महापालिकेत सत्ताधारी भाजपमध्ये महापौर धीरज सूर्यवंशी व स्थायी समिती सभापती अतुल माने यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. महापालिकेच्या विविध प्रश्नांसंदर्भात आमदार सुधीर गाडगीळ यांनी मुख्यमंत्री, महसूलमंत्र्यांसह विविध खात्याच्या सचिवांची भेट घेतली.
यासाठी स्थायीचे सभापती अतुल माने यांना बोलावले गेले; पण महापौर धीरज सूर्यवंशी यांना डावलले. यापूर्वीदेखील भाजपमध्ये हा संघर्ष झाला होता. आता हा संघर्ष आणखी तीव्र वळणावर पोहोचला आहे. त्यामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना मध्यस्थी करण्याची वेळ आली आहे.
सांगली महापालिका निवडणुकीपासूनच भाजपमध्ये गटबाजी उफाळून आली होती. त्याचा काहीसा परिणाम निवडणुकीत झाला आणि भाजपला एकहाती मिळणारी सत्ता गेली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा) पक्षाला सोबत घेऊन भाजपला सत्ता स्थापन करावी लागली. निवडणुका झाल्यानंतर पक्षातील वाद संपेल, अशी अपेक्षा होती. पण पदाधिकारी निवडीत पक्षांतर्गत राजकारण उफाळून आले. महापौरपदाची माळ धीरज सूर्यवंशी यांच्या गळ्यात पडली. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ गटाने नाराजी व्यक्त केली होती.
त्यानंतर स्थायी समिती सभापती निवडीत आमदार गटाने बाजी मारत अतुल माने यांना संधी दिली. माने हे आमदार गाडगीळ यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे स्थायी समितीपासून प्रभाग समित्या आणि समाजकल्याण समितीपर्यंत आमदार गटाचे वर्चस्व असल्याचे दिसून येत आहे. एका प्रभाग समितीत भाजपचे वर्चस्व होते. सभापतीपदासाठी भाजपाकडून महापौर समर्थक उमेदवाराने अर्जही भरला होता. पण तडजोडीअंती हे सभापतीपद विरोधी काँग्रेसला देण्यात आले. यामुळे महापौर आणि त्यांच्या गटाला राजकीयदृष्टय़ा बाजूला ठेवण्याची रणनीती सुरू असल्याचीही चर्चा आहे. आमदार सुधीर गाडगीळ यांनी महापालिकेत दोन कार्यक्रमांना उपस्थिती लावली; पण याकडे महापौर धीरज सूर्यवंशी यांनी पाठ फिरवली. त्यावेळीपासून महापौर व स्थायी समिती सभापतीमधील वाद वाढत गेला आहे.
आता आमदार सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली स्थायी समितीचे सभापती अतुल माने यांच्यासह शिष्टमंडळाने मुंबईत मंत्री व विविध खात्याच्या सचिवांची भेट घेतली. मात्र, महापौर धीरज सूर्यवंशी या बैठकीत नव्हते. शहरातील प्रलंबित विषयांवर या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगितले जात असले तरी महापौरांचा सहभाग नसल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. महापौरांना निमंत्रणच नव्हते की त्यांनीच दूर राहणे पसंत केले, यावर मात्र अधिकृतरीत्या कोणीही बोलण्यास तयार नाही. पण महापालिकेत मात्र दोघांमधील संघर्ष तीव्र झाल्याची चर्चा सुरू आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी अंतर्गत संघर्ष मिटविण्याचा प्रयत्न केला होता; पण पुन्हा गटबाजी सुरू झाली आहे. त्यामुळे भाजपमध्ये सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा रंगली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.