मुंबई: ''नाशिकमधील'म्हाडा' गृह प्रकल्पात गरिबांच्या हक्काची घरे हडपण्याचे प्रकरण अत्यंत गंभीर असून, यात कितीही मोठा 'मासा' असला तरी त्याला सोडले जाणार नाही. गरिबांचे हक्क हिरावून घेणाऱ्या बिल्डरांची गय केली जाणार नाही, प्रसंगी या प्रकरणाचा तपास 'ईडी'कडे सोपवू,'' असा कडक इशारा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशिक दौऱ्यावर असताना भू माफियांना दिला.
बावनकुळे म्हणाले की, गरिबांसाठी राखीव असलेली २० टक्के घरे बळकावण्यासाठी एकाच दिवसात जमिनीचे तुकडे पाडणे आणि नकाशे मंजूर करून घेण्याची मोठी साखळी सक्रिय आहे. या प्रकरणी 'एसआयटी' स्थापण्यात आली असून, १५ दिवसांत तिचा अहवाल प्राप्त होईल.
बदनामीचा १० कोटींचा दावा
''काही धनदांडग्यांनी कर्जमाफीचा लाभ घेऊ नये, तो पैसा गरीब शेतकऱ्यांच्या कामी येईल अशी माझी भूमिका होती. मात्र, 'व्हिडिओ'ची मोडतोड करून माझी बदनामी केली जात आहे,'' असे त्यांनी सांगितले. माझ्याकडे ८० एकर शेती असल्याचे खोटे दावे केले जात असून, प्रत्यक्षात ती २८ एकरच आहे. या प्रकरणी संबंधितांविरुद्ध १० कोटी रुपयांचा अब्रु नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.